Thursday, September 19, 2024
Homeनगरगोदावरीला पूर, जायकवाडीचा उपयुक्तसाठा 50 टक्क्यांवर

गोदावरीला पूर, जायकवाडीचा उपयुक्तसाठा 50 टक्क्यांवर

प्रवरेत 20036 तर मुळात 10738 क्युसेकने विसर्ग

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

गोदावरी, मुळा, प्रवरा या नद्यांमधून जायकवाडी जलाशयात काल सोमवारी सायंकाळी 6 वाजता 69285 क्युसेकने पाण्याची आवक सुरु होती. जायकवाडी जलाशयात 49.86 टक्के उपयुक्तसाठा झाला होता. म्हणजेच 38.23 टीएमसी पाणी उपयुक्तसाठ्यात आहे. दरम्यान, गोदावरीत 67079 क्युसेकने विसर्ग सुरु असून यामुळे गोदावरीला पूर आला आहे.

गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून 67079 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. निळवंडेतून प्रवरा नदीत 20 हजार 36 क्युसेक, मुळातून मुळा नदीत 10 हजार क्युसेक असा विसर्ग धरणांमधून काल सायंकाळी सुरु होता. जायकवाडीच्या दिशेने तीन धरणांचे एकूण 97 हजार 115 क्युसेक ने पाण्याची आवक होत आहे. काल सायंकाळी जायकवाडी जलाशयात 6 वाजता 69285 क्युसेकने पाणी दाखल होत होते. दोन तासांनी रात्री 8 वाजता 66666 क्युसेक आवक सुरु होती. तर गोदावरी च्या मार्गातील नागमठाण सरिता मापन केंद्राजवळ पाण्याची आवक 59700 क्युसेकने होती.

तर प्रवरा मुळाच्या नेवासा तालुक्यातील मधमेश्वर येथे 31172 क्युसेकने पाण्याची आवक होती. जायकवाडीत उपयुक्तसाठा 38.23 टीएमसी इतका झाला होता. म्हणजेच 49.86 टक्के झाला. तर मृतसह एकूण साठा 64.30 टीएमसी इतका झाला आहे. जायकवाडीची मृतसह एकूण साठ्याची क्षमता 102.72 टीएमसी इतकी तर उपयुक्तसाठ्याची क्षमता 76.65 टीएमसी इतकी आहे. जायकवाडी जलाशयात 23 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या दरम्यान 15.23 टीएमसी पाण्याची आवक झाली. 34.63 टक्क्यांवरुन हे धरण 49.86 टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या उपयुक्तसाठा 38.23 टीएमसी इतका झाला आहे. या जलाशयातील साठा समन्यायी प्रमाणे 65 टक्के म्हणजे 50 टीएमसी होण्यासाठी सुमारे 12 टीमएसी पाण्याची आवश्यकता आहे. वरील धरणातील आवक पाहता हा साठा पूर्ण होऊ शकतो.

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या परिसरात रविवारी व काल सोमवारी पावसाची संततधार टिकून होती. त्यामुळे विसर्ग सुरु आहेत. काल सायंकाळी 7 वाजेच्या आकडेवारी नुसार दारणातून 12208 क्युसेक, गंगापूर 9450 क्युसेक, पालखेड मधून 14637 क्युसेक, कडवातून 6584 क्युसेक, भोजापूर मधून 1524 क्युसेक, तसेच दारणा व गंगापूर समुहातील धरणांमधून तसेच नाशिक शहर, निफाड च्या चांदोरी व अन्य भागातील पावसाचे पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत आहे. त्यामुळे काल सायंकाळी 7 वाजता नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून 67079 क्युसेकने विसर्ग सुरु होता. गोदावरीला यामुळे पूर आला आहे. काल सायंकाळी 5 वाजता गोदावरीत 69367 क्युसेकने पाणी सुरु होते.त्यात सायंकाळी 6 वाजता 2288 क्युसेकने कमी करुन तो 67079 क्युसेक वर आणण्यात आला आहे.

गोदावरीतील पुरामुळे गोदावरीचे दोन्ही कालवे टांगले आहेत. त्यांचा विसर्ग बंद झाला आहे. गोदावरीतून काल सकाळी 6 पर्यंत जायकवाडीच्या दिशेने मधमेश्वर बंधार्‍यातून 24.7 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नाशिकच्या धरणांमध्ये गतवर्षी कालच्या तारखेला 78.83 टक्के पाणीसाठा होता. काल तो 90.39 टक्के इतका झाला आहे. काल सकाळी 6 वाजता मागील संपलेल्या 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील घोटी ला 74 मिमी, इगतपुरीला 110 मिमी, दारणाच्या भिंतीजवळ 50 मिमी असा पाऊस नोंदला गेला. तर गंगापूर च्या पाणलोटातील त्र्यंबकला 120 मिमी, अंबोलीला 104 मिमी, गंगापूरला 34 मिमी अशी पावसाची नोंद झाली. अन्य धरणांच्या पाणलोटातही जोरदार पाऊस आहे.

वार्‍यासह भंडारदरात श्रावणसरींचे तांडव; प्रवरेत 20036 तर मुळात
10738 क्युसेकने विसर्ग

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

नगर जिल्ह्यातील शेती, उद्योग, साखर कारखानदारी आणि व्यापार व्यवसायाला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात काल सोमवारी जोरदार वार्‍यासह श्रावणसरींचे तांडव सुरूच होते. त्यामुळे धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे. हे धरण तुडूंब झाल्याने आलेले पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. पाऊस वाढल्यास विसर्ग आणखी वाढविण्याची शक्यता आहे. दरम्यान, अब्रेला फॉलचे विलोभनीय दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी 10883 दलघफू पाणीपातळी कायम ठेऊन पाणी सोडण्यात येत आहे. काल सकाळी 7851 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते.

गत 24 तासांत धरणात नव्याने 630 दलघफू पाणी आले. त्यानंतरही पाऊस वाढल्याने भंडारदरातून सायंकाळी 15239 क्युसकेने पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडेत हे पाणी दाखल होत असल्याने खाली प्रवरेत या धरणातून पाणी वाढविण्यात आले आहे. निळवंडेतून 20036 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. खाली म्हाळुंगी नदीचाही विसर्ग संगमनेरात प्रवरा नदीत जमा होत आहे. भंडारदरात गत 12 तासांत झालेला पाऊस असा-मिमी. भंडारदरा 70, घाटघर 88, रतनवाडी 78, पांजरे 78.

दरम्यान, मुळा पाणलोटातही रविवारच्या तुलनेत सोमवारी पाऊस वाढल्याने काल सायंकाळी कोतूळ येथील मुळा नदीतील विसर्ग 10738 ेक्युसेक होता. तर मुळा धरणातून खाली मुळा नदीत 10 हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या