Saturday, July 27, 2024
Homeनगरगोदावरीतील विसर्ग 7924 क्युसेकवर

गोदावरीतील विसर्ग 7924 क्युसेकवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणा तसेच गंगापूर धरणाच्या परिसरात दोन दिवसांपासून संततधार पाऊस होता. यामुळे या दोन्ही धरणातून बंद असलेला विसर्ग पुन्हा सुरु झाला. तसेच गोदावरीतही 7924 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

- Advertisement -

रविवारी व सोमवारी सह्यद्रिच्या घाटमाथ्यावर संततधार पाऊस सुरु होता. त्यामुळे दारणा समुह तसेच गंगापूर समुहातील पाणीसाठ्यात नवीन पाणी दाखल झाले. एरवी 95 टक्क्यांवर स्थिर असलेला दारणा काल सकाळी फुल्ल झाले. दारणा 100 टक्के भरले! तर गंगापूरचा साठा 96.82 वर स्थिर ठेवत त्यातून विसर्ग करण्यात येत आहे. काल सकाळी दारणाच्या भिंतीजवळ मागील 24 तासांत 36 मिमी, मुकणे 28, वाकी 46, भाम 36, भावली 83, वालेदेवी 6, इगतपुरीला 89 मिमी पावसाची नोंद झाली.

दारणात या पावसामुळे मागील 24 तासांत 265 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. सोमवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता दारणाचा विसर्ग 1900 क्युसेक इतका होता. त्यात रात्री 2 वाजता 800 क्युसेक ने वाढ करुन 2700 क्युसेक करण्यात आला. मंगळवारी पहाटे तो 800 क्युसेक ने वाढवून 3500 क्युसेक इतका करण्यात आला.पुन्हा सकाळी 7 वाजता 5100 क्युसेक वर नेण्यात आला. तो काल सायंकाळी 6 वाजता 4300 क्युसेकवर आणण्यात आला.

गंगापूरचा विसर्ग 537 क्युसेक वर स्थिर आहे. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत गंगापूर च्या भिंतीजवळ 24 मिमी पावसाची नोंद झाली. त्र्यंबकला 31 मिमी, अंबोलीला 24 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी 6 वाजे पर्यंत मागील 24 तासांत गंगापूर मध्ये 120 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. आळंदीतून 87 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. तर वालदेवीतून 25 क्युसेक असा विसर्ग सुरु आहे.

वरील धरणांचे पाणी खाली गोदावरीवरील नांदूरमधमेश्वर ंबंधार्‍यात दाखल होत असल्याने गोदावरीचा विसर्ग पुन्हा सुरु झाला आहे. काल सकाळी 6 वाजता नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून 500 क्युसेक ने पाणी गोदावरीत सोडण्यात येवु लागले. हा विसर्ग 1114 क्युसेकने वाढवून तो सकाळी 8 वाजता 1614 क्युसेक इतका करण्यात आला. त्यात एक तासाने वाढ करुन तो 3155 क्युसेक करण्यात आला. नंतर वाढवत तो दुपारी 12 वाजता 7924 क्युसेक वर नेण्यात आला. तो काल उशीरा पर्यंत स्थिर होता. यामुळे गोदावरीचे पात्र पुन्हा भरुन वाहु लागले आहे.

जायकवाडी उपयुक्तसाठा 33.35 टक्के !

जायकवाडी जलाशयात यंदा 11.5 टीएमसी नवीन पाणी दाखल झाले. उपयुक्तसाठा 25.56 टीएमसी इतका आहे. म्हणजेच हा साठा 33.35 टक्के इतका आहे. तर मृतसह एकूण साठा 51.6 टीएमसी इतका आहे. हा एकूण साठा 50.26 टक्के इतका आहे. काल उपयुक्तसाठा 33.35 टक्के आहे, मागील वर्षी कालच्या तारखेला तो 96.42 टक्के इतका होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या