राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
यंदा नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीतून 103.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे तर जायकवाडीतून खाली पुन्हा गोदावरीत तब्बल 171 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने 1969 साली तब्बल 185 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. 1981 साली 130 टिएमसी पाणी त्यानंतर 2005 मध्ये 170 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 2006 साली 162 टिएमसी पाणी गोदावरीतून वाहिले. त्यानंतर 2022 मध्ये 125 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. गेल्या वर्षी 2024 मध्ये 58.4 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यंदा 17 नोव्हेंबर अखेर नांदूर मधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने 103.6 टिएमसी पाण्याचा विसर्ग झाला.
यंदा धरणाच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातही पावसाने पाणीच पाणी केले. नांदूर मधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने 11 लाख 99 हजार 720 क्युसेक पाणी वाहिले. म्हणजेच 1 लाख 3 हजार 692 दलघफू पाणी वाहिले हे पाणी 103.6 टिएमसी इतके आहे. काल नाशिकच्या धरणांमध्ये उपयुक्तसाठा 98.53 टक्के इतका आहे. गतवर्षी कालच्या तारखेला तो 98.15 टक्के इतका होता.
नांदूर मधमेश्वर बंधार्यातून गोदावरतीत 1976 ते 2025 या कालखंडात केवळ 7 वेळा बंधार्यातील विसर्गाने 100 टिएमसीचा टप्पा ओलांडला आहे. 1981 च्या पावसाळ्यात 130 टिएमसी पाणी गेल्यानंतर तब्बल 24 वर्षांनी म्हणजेच 2005 मध्ये 170 टिएमसी पाण्याचा विसर्ग झाला होता. जसे सर्वाधिक पाणी वाहुन जाण्याचे विक्रम आहेत, तसे कमी पाणी वाहुन जाण्याचेही विक्रम आहेत. 1987 च्या हंगामात 661 दलघफू आणि 1995 मध्ये 460 दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिले आहे. त्यावेळी दुष्काळी परिस्थिती होती.
यंदा नाशिकच्या दारणातून 29.3 टिएमसी, गंगापूरमधून 12.1 टिएमसी, कडवातून 6.6 टिएमसी, मुकणेतून 1.2 टिएमसी, भोजापूरमधून 459 दलघफू, आळंदीतून 1.9 टिएमसी, वालदेवीतून 2.2 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हा विसर्ग तसेच मुक्त पाणलोटातूनही पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्यात दाखल झाल्याने या बंधार्यातून यंदा 103 टिएमसी हुन आधिक पाण्याचा विसर्ग झाला. याशिवाय नांदूर मधमेश्वर बंधार्याचा पुर्व भाग ते जायकवाडीेचे बॅक वॉटरपर्यंच पावसाचे पाणी जायकवाडीत दाखल झाले. मुळा तसेच प्रवरेतील पाणीही मोठ्या प्रमाणात जायकवाडीत वाहुन आले. याशिवाय मराठवाड्यातील पावसाचे पाणीही जायकवाडीत दाखल झाले.
यंदा नगर तसेच नाशिकची धरणं ऑगस्ट महिन्यातच भरली. नंतरच्या पावसाचे अतिरिक्त पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिले. त्यामुळे जायकवाडी तुडूंब भरुन 171 टिएमसी पाणी खाली गोदावरीत वाहुन गेले. जायकवाडीत एकूण पाणी साठवण क्षमता 102 टिएमीची आहे. त्यात उपयुक्तसाठा 76 टिएमसी इतका आहे. यंदा जायकवाडीचा ओव्हर फ्लो जिवंत साठ्याच्या अडीच पट आहे.
नाशिक जिल्ह्यातील सर्वच बंधार्यांचे विसर्ग बंद करण्यात आले आहेत. मात्र नांदूर मधमेश्वर बंधार्यात ओढे व अन्य छोट्या नद्यांचे पाणी किरकोळ पाणी दाखल होत असल्याने या बंधार्यातून 400 क्युसेकने विसर्ग कालही सुरु होता. 4 ते 5 दिवसात हा विसर्ग बंद होण्याची शक्यता आहे.




