राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
जोरदार पावसामुळे दारणा धरणात 24 तासात अर्धा टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तर गंगापूर धरणात 441 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. काल दिवसभर पावसाने काही भागात उघडीप दिली होती. मात्र काल सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने धरणांमध्ये दूरवरून घाट माथ्यावरील पाणी वाहून येत आहे. दारणा धरणातून काल सकाळपर्यंत 1.7 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर या धरणात काल सकाळपर्यंत 3.3 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. काल सकाळी सहा वाजेपर्यंत मागील 24 तासात धरणात 523 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. धरणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे 137 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर घोटी येथे 93 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाच्या भिंतीजवळ 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे. काल दिवसभर धरण क्षेत्रात पावसाने उघडीप दिली होती. रिमझिम स्वरूपाचा पाऊस अधूनमधून पडत होता. पाणलोटातील इगतपुरी व घोटी भागात पावसाच्या अधूनमधून सरी येत होत्या.
भावली धरणाच्या पाणलोटात काल सकाळपर्यंत मागील 24 तासात 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भावली धरण 70.85 टक्के भरले आहे. मुकणे धरण 48.43 टक्के भरले आहे. वाकी 55.03 टक्के, 49.72 टक्के भरले आहे. वालदेवी 45.98 टक्के भरले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोटातही पावसाचा जोर ओसरला आहे. पाण्याची आवक गंगापूरमधून सुरू असलेला 6160 क्युसेकने सुरू असलेला विसर्ग 4400 क्युसेक पर्यंत घटविण्यात आला आहे. काल सकाळी संपलेल्या मागील 24 तासात गंगापूरच्या पाणलोटातील आंबोली येथे 195 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर त्र्यंबक येथे 90 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारच्या दिवसभरातील पावसाने दूरवरून पाण्याची आवक सुरू असल्याने 24 तासात गंगापूरमध्ये 441 दलघफू पाण्याची आवक झाली. गंगापूरचा साठा 61.37 टक्क्यांवर स्थिर आहे.
गंगापूर समूहातील कश्यपी निम्मे भरले आहे. गौतमी गोदावरी 32.87 टक्के भरले आहे. नांदूर मधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी 15,775 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. काल सकाळी सहा वाजेपर्यंत मागील 24 तासात मधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 5.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. काल सायंकाळी जायकवाडीत गोदावरीतून 11,637 क्यूसेक वेगाने पाणी दाखल होत होते. काल सायंकाळी जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा 35.59 टक्के इतका झाला होता. मृतसह एकूण साठा 53.3 टीएमसी इतका झाला आहे, तर उपयुक्त साठा 27.2 टीएमसी इतका झाला आहे.




