अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहर व परिसरात अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन कारफोडीच्या घटना घडल्याने एकच टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन्ही ठिकाणी लग्नसमारंभासाठी आलेल्या पाहुण्यांच्या कारच्या काच फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीसह रोख रक्कम आणि महत्त्वाचे कागदपत्रे लंपास केली आहेत. सदरचा प्रकार सोमवारी (19 मे) रात्री घडला. या घटनांमुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुण्याहून अहिल्यानगर येथे चुलत भावाच्या लग्नासाठी आलेल्या कीर्ती आनंदा खंदारे (वय 45, रा. काळेवाडी, पिंपरी-चिंचवड, पुणे) यांनी त्यांच्याकडील बॅग त्यांचा भाऊ आनंद पांडुरंग डफळ (रा. तोफखाना, अहिल्यानगर) यांच्या कार (एमएच 16 बीझेड 7582) मध्ये ठेवून ते त्या कारने मनमाड रस्त्यावरील वृंदावन लॉन्स येथे गेले होती. कार वृंदावन लॉन्स पार्किंगमध्ये उभी होती व ते लॉन्समध्ये सुरू असलेल्या हळदी कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान, कार्यक्रम संपल्यावर परत येताना कारची मागील काच फोडलेली दिसली आणि काळ्या रंगाची बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या बॅगमध्ये पाच ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, दोन ग्रॅम वजनाचा सोन्याचा पेंडंट, 10 हजाराची रोकड, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, डेबिट कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. खंदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पोखर्डी (ता. अहिल्यानगर) शिवारात घडली. साई आनंद लॉन्समध्ये प्रफुल्ल झुंबर आव्हाड (वय 29, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा, मूळ रा. लोहारवाडी, ता. नेवासा) यांची एमएच 36 एजी 3060 क्रमांकाची कार पार्किंगमध्ये उभी होती. लग्नकार्यक्रमादरम्यान चोरट्यांनी कारची काच फोडून गळ्यातील 10 ग्रॅम सोन्याची चेन, पाच ग्रॅमची अंगठी आणि मोबाईल असा एकूण 65 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आव्हाड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच टोळीचा संशय
या दोन्ही घटना एकाच रात्री आणि लग्नसमारंभाच्या ठिकाणी घडल्यामुळे एकाच टोळीकडून या चोरीच्या घटना घडल्याची शक्यता पोलीस तपासात व्यक्त करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असून, परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. दरम्यान, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरटे कारफोडी करत असल्याने नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू वाहनांमध्ये न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.