अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
ओळखीच्या व्यक्तीने कपाटाची चावी घेऊन त्यातील सुमारे आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 35 हजारांची रोकड असा एक लाख 92 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये घडली. या प्रकरणी दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (1 जुलै) घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारीका भरत आवारे (वय 40 रा. निसर्ग रो-हौंसिग, गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. विशाल बाबासाहेब पाटोळे व नयन पाटोळे (दोघे रा. गांधीनगर, बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. शनिवारी (29) सकाळी नेहमीप्रमाणे सारीका व त्यांचे पती कामावर गेले असता त्यांची मुलगी व मुलगा घरीच होते. सारीका यांनी दोन ग्रॅमचे सोन्याचे कॉईन करून ते दुपारी चार वाजता कपाटात ठेऊन त्या पुन्हा कामावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी व मुलगा घरी होते. त्यांच्या पतीचा पगार झाल्याने त्यांनी पतीला पगाराचे पैसे कपाटात ठेवण्यास सांगितले. पतीने रात्री आठ वाजता पैसे ठेवण्यासाठी कपाट उघडले असता त्यांना कपाटात असलेले सोन्याचे दागिने व रोकड दिसून आली नाही. त्यांनी पत्नी सारीकाला माहिती दिली.
दोघांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने सांगितले,‘सायंकाळी सात ते साडेसात वाजता मी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना विशाल पाटोळे व नयन पाटोळे घरात आले होते. त्यावेळी विशाल याने कपाटाची चावी मागितली व मी त्याला कपाटाची चावी दिली. काही वेळ ते घरात थांबले व पाठीमागील दरवाजाने निघून गेले’ असे सांगितल्याने. कपाटातील ठेवलेले साडेचार तोळ्याचा सोन्याचा राणीहार, दीड तोळ्याचे कानातील सोन्याचे झुंबे, अर्धा तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एक तोळ्याच्या पाच लहान सोन्याच्या अंगठ्या, चार ग्रॅमचे कॉईन व 35 हजारांची रोकड असा एक लाख 92 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. पोलिसांनी दोघांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार जी. जी. गोर्डे करत आहेत.