जामखेड । तालुका प्रतिनिधी
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एक व्यक्ती लुटल्याची गंभीर घटना जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे घडली आहे. या घटनेत सुमारे १० लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल जबरीने चोरीला गेले. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपी फरार आहेत.
फिर्यादी राजेंद्र दिलीप मैड (वय ३५, रा. आश्वी, ता. संगमनेर) यांना आरोपी महिलेने १५० ग्रॅम सोने केवळ १० लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवले. १४ मे रोजी फिर्यादी ठरल्याप्रमाणे पैसे घेऊन कुसडगाव येथे गेले. मात्र, तेथे पोहोचल्यावर अश्विनी आणि तिच्या आठ ते दहा साथीदारांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील दहा लाख रुपये, सोन्याचे दागिने व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले.
या घटनेवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २६६/२०२५, बीएनएस कलम ३१०(२) अन्वये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनंत सालगुडे आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तपासाची जबाबदारी घेतली.
१५ मे रोजी पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही आरोपी जवळा (ता. जामखेड) येथे येणार असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार कारवाई करत सोन्या शिवाजी काळे (वय २८), अभित्या शिवाजी काळे (वय ३२), दोघेही रा. सरफडोह, शुभम रामचंद्र पवार (वय १८, रा. सरदवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीनंतर ताब्यातील आरोपींनी गुन्ह्यात सहभागी असलेल्यांची नावे उघड केली. त्यात विकास काज्या काळे, जरेणी विकास काळे, लालासाहेब काज्या काळे, किरण काज्या काळे (सर्व रा. पोंदवडी, ता. करमाळा), वनिता पवार, दिक्षा पवार (रा. सरदवाडी), सुनिल काळे व रेश्मा काळे (रा. सरफडोह) हे आरोपी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
ताब्यातील आरोपींना जामखेड पोलीस स्टेशनला पुढील तपासासाठी हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, व उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे यांच्या सूचनेनुसार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.