Thursday, May 30, 2024
HomeUncategorizedचोरीचे सोने खरेदी करणारा सोनार जेरबंद

चोरीचे सोने खरेदी करणारा सोनार जेरबंद

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

सोने चोरून विकणाऱ्या चोरांच्या टोळीचा म्होरक्या योगेश सीताराम पाटेकर आणि त्याच्याकडून चोरीचे सोने विकत घेणारा सोनार योगेश बाबूराव नागरे अशा दोघांनाही पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चोराच्या म्होरक्यासह सोनारालाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

दोघांना जवाहरनगर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील २८ हजार ५०० रुपयांची ४५५५ ग्रॅम सोन्याची लगड आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच २० एफसी ६५१०) असा ऐवज हस्तगत करण्यात आला. योगेश पाटेकर हा नगर जिल्ह्यातील भोकर या गावचा रहिवासी आहे. तो सध्या समर्थनगरात राहतो तर योगेश नागरे हा संगमनेर या गावात दिवेकर गॅस एजन्सीजवळ राहतो. वंदना समीर निंबाळकर (५१, रा. एन-७, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, ६ मे रोजी त्या पतीसह नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी पन्नालालनगर येथे जात असताना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील एसएफएस शाळेसमोर अचानक पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. मात्र, त्यांनी तात्काळ मंगळसूत्र धरून ठेवले. त्यामुळे मंगळसूत्राचा काही भाग तुटून चोरट्यांच्या हाती लागला. तेवढा भाग घेऊन त्यांनी धूम ठोकली. जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता टोळीचा म्होरक्‍या योगेश पाटेकर हा समर्थनगर येथे भाड्याच्या घरात राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी योगेश पाटेकर याला अटक केली असता विनोद ऊर्फ खंग्या विजय चव्हाण आणि अक्षय त्रिभुवन यांच्या साथीने म्हाडा कॉलनी, तीसगाव, छत्रपती संभाजीनगर ते श्रीरामपूर येथून दुचाकीने शहरात येऊन तब्बल आठ मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या सोन्याचा हिस्सा योगेश नागरे याच्याकडे दिल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी योगेश नागरे याला अटक करून त्याच्या ताब्यातून तब्बल ५ लाख ३० हजार रुपयांचे सोने जप्त केले. न्यायालयात सहायक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी युक्तिवाद केला को, या टोळीतील एक साथीदार पसार झालेला आहे. त्याला व विनोद ऊर्फ खंग्या चव्हाण याला अटक करायची आहे.

गुन्ह्यातील उर्वरित सोन्याचा ऐवज हस्तगत करायचा आहे. सोनार नागरे याने अशा प्रकारे आणखी गुन्हेगारांकडून सोन्याचे दागिने विकत घेतल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सोनारासह चोराला पोलीस कोठडी देण्याची विनंती जाधव यांनी न्यायालयात केली असता दोघा आरोपींना २६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकरी जी.डी. गुरनुले यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या