नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारताला अतिरिक्त टॅरिफ लागू करण्याची धमकी देत आहेत. काही दिवसांपूर्वीच भारतावर २५ टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड आकारला जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले होते. सोमवारी संध्याकाळी केलेल्या सोशल पोस्टमध्ये रशियाकडून भारत तेल खरेदी करतो म्हणून आणखी टॅरिफ आकारले जाईल, अशी नवी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. यावर आता ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आरोप करणाऱ्या देशांनी प्रथम स्वतःकडे बघावे, असे भारताने म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
भारत रशियाकडून विकत घेत असलेल्या कच्च्या तेलाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली. रशियाकडून खरेदी केलेले कच्चे तेल खुल्या बाजारात विकून भारत भरपूर नफा कमवत आहे. युक्रेनमध्ये रशियाच्या वॉर मशिनमुळे किती लोक मारले जात आहेत, या बाबीशी भारताला काहीही देणेघेणे नाही. म्हणूनच मी भारतावरील टॅरिफ आणखी वाढवणार आहे, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल साइटवरुन दिला.
भारताचे ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या एक्स हँडलवर म्हटले आहे की, रशियाकडून तेल आयात केल्यामुळे भारत अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या रडारवर आहे. खरे तर, युद्ध सुरू झाल्यानंतर तेलाचा पुरवठा युरोपकडे वळवण्यात आल्यामुळे भारताने रशियाकडून आयात करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जागतिक स्तरावरील ऊर्जा बाजारपेठेतील समतोल टिकवण्यासाठी अशा प्रकारची आयात करण्यास अमेरिकेने भारताला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले होते”, असे या निवेदनात भारताने स्पष्ट केले आहे.
भारतावर टीका करणारे देश हे रशियासोबत व्यापार करत असल्याची टीका प्रवक्त्यांनी केली आहे. भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या दरात इंधन उपलब्ध होण्यासाठी भारताने रशियाकडून तेल आयात केले. जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीमुळे भारताला हे करणे भाग पडले, मात्र जे देश भारतावर टीका करतात त्या देशांनी देखील रशियासोबत व्यापर केल्याचे समोर आले आहे. आमच्याप्रमाणेच या देशांनाही हा व्यापर करणे आवश्यक असल्याने सर्व चालू आहे, आहे, असा आरसा भारताने दाखवला.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, २०२४ मध्ये युरोपियन युनियनचा रशियासोबतचा द्विपक्षीय व्यापार ६७.५ अब्ज युरो होता. याशिवाय २०२३ मध्ये व्यापार १७.२ अब्ज युरो होता. हा त्या वर्षी किंवा पुढील वर्षी भारताच्या रशियासोबतच्या एकूण व्यापारापेक्षा खूपच जास्त आहे. २०२४ मध्ये युरोपियन एलएनजी आयात विक्रमी १६.५ दशलक्ष टनांवर पोहोचली, जी २०२२ मध्ये १५.२१ दशलक्ष टनांच्या मागील विक्रमाला मागे टाकते.
अमेरिकेचा रशियाशी युरेनियमचा व्यापार
दरम्यान, अमेरिकेचा रशियाशी युरेनियमचा व्यापार होत असल्याची बाब या निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे. अमेरिकेबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या आण्विक क्षेत्रासाठी, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी, फर्टिलायझर आणि रासायनिक उत्पादनांसाठी ते रशियाकडून बऱ्याच काळापासून युरेनियम हेक्साफ्लुओराईड खरेदी करत आहेत. म्हणून, भारताला लक्ष्य करणे थांबवा, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत त्यांच्या राष्ट्रीय हितांचे आणि आर्थिक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय करेल. असे या निवेदनात भारताने नमूद केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




