अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडत लांबल्याचे दिसत आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणार्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडणार असून आधीच्या 99 आणि आता 2026 मध्ये 767 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. जिल्हा परिषद निवडणूका झाल्याशिवाय मुदत संपलेल्या या 866 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणार नाहीत. मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका आता दिवाळीनंतर किंवा थेट पुढील वर्षी होण्याचा अंदाज प्रशासनाला आहे.
जिल्ह्यातील 2024-25 मधील मुदत संपलेल्या 99 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आधी लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडल्या. सध्या येथे प्रशासकामार्फत कारभार सुरू आहे. आता त्यात ही पुढील महिन्यांत 767 ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपणार आहे. तेथे निर्धारित वेळेत नवे सदस्य निवडून येण्यासाठी डिसेंबर महिन्यातच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. परंतू आधी नगरपालिकांची प्रक्रिया आणि त्यानंतर लांबलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका यामुळे जिल्ह्यातील 866 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी दिवाळीनंतर प्रक्रिया सुरू होणार आहे.
दरम्यान मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियपूर्वी त्या त्या ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम तयार करून तो प्रसिध्द करून त्यावर हरकती, सुनावणी घेवून तो अंतिम करून प्रसिध्द करावा लागतो. यासाठी साधारणपणे एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो. जिल्ह्यात अजून जिल्हा परिषदांच्या निवडणूका होणे बाकी आहेत. त्या निवडणूक उन्हाळ्यात झाल्यास त्यानंतर पावसाळ्यात कोणत्याच निवडणूका होत नाहीत. जिल्ह्यातील पावसाळा साधारण दिवाळीच्या दरम्यान संपतो. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक तयारीसाठी महिना-दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने जिल्ह्यातील 866 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी पुढील वर्षी जानेवारीच उजाडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
99 ग्रामपंचायतींवर प्रशासक राजचे तिसरे वर्षे
जानेवारी ते डिसेंबर 2024 मध्ये मुदत संपलेल्या 84 ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व मतदार याद्यांचा कार्यक्रम पूर्ण झाला होता. तसेच जानेवारी ते डिसेंबर 2025 मधील मुदत संपलेल्या 14 ग्रामपंचायतीच्या देखील प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यामुळे या 99 ग्रामपंचायतीच्या निवडणुका अगोदर होतील. शिवाय काही ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या पोटनिवडणुका होणार आहेत. यानंतरच 2026 मधील 768 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
2026 मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायती
अकोले 52, संगमनेर 94, कोपरगाव 29, राहाता 25, श्रीरामपूर 27, राहुरी 44, नेवासा 59, पाथर्डी 78, शेवगाव 48, कर्जत 56, जामखेड 47, पारनेर 88, श्रीगोंदा 59 एकूण 765 असे आहेत.




