Friday, May 3, 2024
Homeनगरराहुरी : 13 गावांतील ग्रामपंचायत सदस्यांच्या 16 जागांसाठी पोटनिवडणूक !

राहुरी : 13 गावांतील ग्रामपंचायत सदस्यांच्या 16 जागांसाठी पोटनिवडणूक !

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि राहुरी व देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजू लागला असतानाच आता ग्रामपंचायत सदस्यांच्या 16 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता देवळाली प्रवरा व राहुरी पाठोपाठ तालुक्याचा ग्रामीण भागही ढवळून निघणार आहे. त्यासाठी अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत. पुढील वर्ष तालुक्याच्या दृष्टीने निवडणुकांचे वर्ष ठरणार असल्याने राजकीय हवा ऐन थंडीतही गरमागरम होणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचे स्वागत करताना जोरदार राजकीय हालचाली होणार असल्याचे चिन्ह आहे.

- Advertisement -

काही सदस्यांचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे काही ग्रामपंचायतींमध्ये रिक्त झालेल्या 13 गावांमधील 16 ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुका लवकरच होणार आहेत. निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणी मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर हालचालीही सुरू झाल्या आहेत. राहुरी तालुक्यात निधन, राजीनामा, अनर्हता, किंवा इतर कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. करोनामुळे गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त जागा भरल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे अशा ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादी अंतिम करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला आहे.

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव-2 (अनु.जाती, अनु.जमाती), धामोरी खुर्द-1 (अनु. जमाती), मुसळवाडी -2 (अनु. जाती स्त्री, अनु. जमाती), पिंप्री वळण-1 (अनु. जमाती महिला), आरडगाव- 1 (नागरिकांचा मागास प्रवर्ग), ब्राम्हणगाव भांड-1(अनु. जमाती स्त्री), मोमीन आखाडा – 2 (सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री), पिंपळगाव फुणगी-1 (सर्वसाधारण), चिंचोली-1 (नागरिकांचा मागास प्रवर्ग), राहुरी खुर्द-1 (सर्वसाधारण स्त्री), शेरी चिखलठाण-1 (अनु.जमाती), ताहाराबाद- 1 (नागरिकांचा मागास प्रवर्ग), तांदुळनेर-1 (सर्वसाधारण) आदी 13 गावांमध्ये 16 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आली आहे. तर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि.12 ते 16 नोव्हेंबर 2021 असा होता. दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्रा.पं. रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान राहुरी तालुक्यातील सुमारे 76 सेवा संस्थांचा निवडणूक कार्यक्रम आगामी काळात जाहीर होणार आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद, पंचायत समिती व डॉ. तनपुरे साखर कारखाना आदी संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. त्यासाठी नेत्यांबरोबरच कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. एवढ्या निवडणुका होणार असल्याने तालुक्याची हवा निवडणूकमय होणार आहे. तर कार्यकर्त्यांनाही यानिमित्ताने पर्वणी चालून आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या