Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनिफाड : आहेरगाव येथील द्राक्ष मुंबईकरांच्या दारी

निफाड : आहेरगाव येथील द्राक्ष मुंबईकरांच्या दारी

निफाड । Niphad

करोना संसर्ग वाढल्याने द्राक्ष विक्रीस अडचणी येवू लागल्या. परिणामी शेतकर्‍यांनी आता थेट बाजारपेठा गाठत द्राक्ष विक्री सुरू केली आहे. आपल्या अविट गोडीमुळे निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील द्राक्ष मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात विक्री होऊ लागली आहे.

- Advertisement -

द्राक्षपंढरी म्हणून निफाडची ओळख आहे. मात्र गेल्या तीन-चार वर्षापासून नैसर्गिक आपत्ती व करोनामुळे द्राक्ष उत्पादक अक्षरशः देशोधडीला लागले आहे. सुजलाम् सुफलाम् समजल्या जाणार्‍या येथील शेतकर्‍यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मोठ्या जिद्दीने कमवलेली निर्यातक्षम द्राक्षे कवडीमोल भावाने विकावी लागत आहे. मात्र पिकेल ते विकेल या कृषीमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतील विक्री व्यवस्था नाशिकच्या द्राक्ष विज्ञान मंडळ यांनी प्रत्यक्षात उतरवत निफाडची द्राक्ष मुंबईत विक्री करण्यासाठी पाठबळ दिले.

त्या अनुषंगाने आहेरगावचा युवा प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रमोद सुभाष साठे यांनी आपली द्राक्षे बुधवारी मुंबईत शिवाजी पार्क परिसरात विक्रीसाठी स्टॉल लावला. मात्र करोनाचे कारण देत महापालिकेच्या काही सेवकांनी त्यांना द्राक्ष विक्रीस मज्जाव केला.

याची तक्रार शेतकरी साठे यांनी द्राक्ष विज्ञान मंडळ अध्यक्ष डॉ.वसंत ढिकले, बाबाजी संगमनेरे यांच्यामार्फत माजी आमदार अनिल कदम यांच्याकडे केली.

त्यांनी तातडीने दखल घेत शिवसेना भवनात संपर्क साधून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना शिवाजी पार्क येथे घटनास्थळी पाठवले. शिवसेना पदाधिकारी यांच्या दणक्यानंतर त्या शेतकर्‍यांना द्राक्ष विक्रीचा तात्पुरता परवाना मिळवून देत द्राक्ष विक्री स्टॉल पूर्ववत केला.

त्यामुळे 40-50 रुपये प्रति किलो चांगल्या दराने द्राक्ष विकली गेल्याने आहेरगावच्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. या घटनेची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली होती. त्यामुळे अनेकांनी माजी आमदार कदम यांचे सोशल मीडियातून आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या