Friday, May 3, 2024
Homeनाशिकढगाळ हवामानामुळे द्राक्षउत्पादक धास्तावले

ढगाळ हवामानामुळे द्राक्षउत्पादक धास्तावले

निफाड। प्रतिनिधी Niphad

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले असून काल शुक्रवारी पहाटे तालुक्याच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने द्राक्ष उत्पादनात घट होण्याचे संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागेवर भुरी, करपा तर कांदा पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रतिकूल वातावरणापासून द्राक्षबागांसह इतर पीके वाचविण्यासाठी शेतकरी किटकनाशक औषधांसह पोषके व संजीवके फवारणीत व्यस्त झाले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या ढगाळ हवामानाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सद्यस्थितीत शरद सिडलेस, नानासाहेब पर्पल्स, जम्बो या द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता अधिक आहे. तर ज्या द्राक्षबागा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे त्याची मणीगळ व घरकूज होऊन डावणी व भुरी रोगाचा प्रादूर्भाव वाढणार आहे. तर ज्या द्राक्षबागा लेट आहे म्हणजेच दोडा स्टेजमध्ये आहे त्याची देखील मोठ्या प्रमाणात मणीगळ होण्याची शक्यता आहे.

आधीच मागील वर्षी करोना प्रादूर्भावामुळे हातात आलेले द्राक्षपीक शेतकर्‍यांना मातीमोल भावाने विकावे लागत होते. त्यामुळे यावर्षी त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व प्रथम दर्जेदार उत्पादन घेण्याबरोबरच निसर्गाच्या लहरीपणातून द्राक्षपीक वाया जावू नये यासाठी शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत द्राक्षबाग वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करण्यात व्यस्त झाला आहे. यावर्षी परतीच्या पावसाने दिर्घकाळ हजेरी लावल्याने कांदा रोपांना करपा चा सामना करावा लागणार आहे. तर ज्या शेतकर्‍यांनी कांदा लागवड केली अशा कांदा पीकावर मावा, करपा, भुरीचा प्रादूर्भाव वाढून पीकांची वाढ खुंटणार आहे.

गहू पीकासाठी देखील ढगाळ हवामान डोकेदुखी ठरू पहात आहेत. साहजिकच गहू पीकावर मावा, तुडतुडे वाढण्याचा धोका वाढला असल्याने शेतकरी किटकनाशक औषधांची फवारणी करतांना दिसत आहे. निफाड तालुक्यात सर्वाधिक थंडीचा माहोल दिसून येत असून त्यात पाऊस अन् ढगाळ हवामानामुळे हातात आलेली पीके वाया जाण्याचा धोका वाढल्याने या प्रतिकूल परिस्थितीत पीके वाचविण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करतांना दिसत आहेत. ढगाळ हवामानाचा भाजीपाला पीकाला देखील फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तालुक्यात आणखी किमान दोन दिवस ढगाळ हवामान कायम राहण्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.

किटकनाशक औषधांची फवारणी करावी

ज्या द्राक्षबागांमध्ये पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे अशा द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका सर्वाधिक आहे. तर फ्लॉवरिंगच्या स्टेजमधील द्राक्षघडांची कूज होण्याबरोबरच मणीगळ होईल. फ्लॉवरिंगच्या स्टेजमधील द्राक्षबागांवर डावणी, भुरीचा प्रादूर्भाव वाढेल. त्यामुळे शेतकर्‍यांनी औषधांची फवारणी करावी व वेळोवेळी कृषीतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. या ढगाळ हवामानाचा कांदा, गहू, टोमॅटो, भाजीपाला आदी पीकांना देखील फटका बसण्याची शक्यता अधिक आहे.

संदिप माळी, सेल्समन (दीपक फर्टीलायझर कंपनी)

- Advertisment -

ताज्या बातम्या