अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
चिचोंडी पाटील (ता. अहिल्यानगर) येथील एका द्राक्ष बागायतदार शेतकर्याकडून खरेदी केलेल्या द्राक्षांचे पैसे न देता तसेच दिलेले धनादेश न वटल्याने तब्बल 7 लाख 26 हजार 362 रूपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात नागपूर येथील द्राक्ष व्यापार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फकिरा बाबुराव पवार (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. मोहम्मद अकील मोहम्मद शमसु रेयान (रा. कलमना मार्केट, नागपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापार्याचे नाव आहे.
पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डिसेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत मोहम्मद रेयान या द्राक्ष व्यापार्याने पवार यांचा विश्वास संपादन केला. दरम्यान, त्याने पवार यांच्या बागेतील द्राक्षे विविध वेळा खरेदी केली. मात्र विक्रीची रक्कम देण्यास सुरूवातीपासूनच टाळाटाळ केली. पवार यांनी वेळोवेळी पैसे मागितले असता संशयित आरोपी व्यापार्याने उडवाउडवीची उत्तरे देत विलंब लावला. त्याने दिलेले धनादेश पवार यांनी बँकेत जमा केले असता, आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ते धनादेश बाउन्स झाले.
वारंवार मागणी करूनही पैसे न देता आरोपीने एकूण 7 लाख 26 हजार 362 रूपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात मोहम्मद अकील मोहम्मद शमसु रेयान याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय हिंगडे हे करीत आहेत.




