अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
‘ग्रो मोअर’ कंपनीचा संचालक संदीप भास्कर सावळे (वय 43, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) याला राहाता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आठ दिवसांची (8 डिसेंबरपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे.
यापूर्वी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरूध्द राहाता आणि शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. भूपेंद्र सावळे आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून घेतली. मात्र परतावा तर सोडाच, मूळ रक्कमही न देता त्यांनी सर्वांची फसवणूक केली.
या फसवणुकीबाबत सुरूवातीला राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यातही यासंदर्भातील गुन्हा नोंदविण्यात आला. हे दोन्ही गुन्हे पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून, सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी भूपेंद्र सावळे याच्याविरूध्द राहाता आणि शिर्डीतील गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. तपासादरम्यान करण्यात आलेल्या प्रारंभिक ‘मनीट्रेल’ अहवालानुसार, या संपूर्ण योजनेत तब्बल 723 कोटी रूपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुंतवणुकीवर दरमहा अधिक परतावा मिळेल या आमिषाने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. भूपेंद्र सावळेला अटक झाली असली तरी इतर काही संशयित पसार होते. त्यातील संदीप सावळे याची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आठरे, अंमलदार दिनेश राठोड, योगेश घोडके आणि अजय खोमणे यांच्या पथकाने संदीप सावळे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले.
तीन बँक खात्यांवर संशयास्पद व्यवहार
भूपेंद्र सावळेविरूध्द दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्याचा सखोल ‘मनीट्रेल’ करण्याचा निर्णय घेतला. प्राप्त प्राथमिक अहवालानुसार, संदीप सावळे यांच्या नावावर असलेल्या तीन खात्यांमध्ये तब्बल 1 कोटी 35 लाख रूपयांचा संशयास्पद व्यवहार आढळला आहे. या संदर्भातील माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.





