अहिल्यानगर । सचिन दसपुते
चांगला परतावा मिळेल अशा आमिषाने नागरिकांची फसवणूक करणार्या ‘ग्रो मोअर’ कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास अधिकच खोलात गेल्याचे दिसत आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे (वय 27, रा. शिर्डी) याच्यासह इतर संशयितांच्या नावे असलेल्या 11 बँक खात्यांमध्ये तब्बल 865 कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे.
सावळे याने स्थापन केलेल्या ‘ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स’, ‘ग्रो मोअर फिनकेअर सर्व्हिसेस’, ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट’, आणि ‘ग्रो मोअर स्वराज्य कॅपिटल’ या कंपन्यांमार्फत शेकडो गुंतवणूकदारांकडून तब्बल 553 कोटी रूपयांची गुंतवणूक उभारली होती. यातील 454 कोटी रूपये गुंतवणूकदारांना परत दिल्याचा दावा त्याने चौकशीत केला आहे, तर उर्वरित रक्कम शेअर मार्केटमधील व्यवहारांमध्ये गुंतवली असून 81 कोटींचे नुकसान झाल्याचेही त्याने कबूल केले आहे.
सावळे याला अलीकडेच अटक करून 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्या कालावधीत त्याच्याकडून सखोल चौकशी केली असता वरील सर्व व्यवहार उघडकीस आले. 25 जुलै रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला राहाता येथील एम.पी.आय.डी. विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 29 जुलैपर्यंत आणखी 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी सावळे याच्या मालमत्तेची चौकशी करत असताना शिर्डीतील आलिशान घर, महागड्या गाड्या, सोने, तसेच प्लॉट खरेदी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या मालमत्तांची माहिती गोळा करून पोलिसांकडून जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ग्रो मोअर घोटाळ्यात सावळे एकटा नव्हे, तर इतर चौघे संशयित आरोपी आहेत. या संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.
13 अनधिकृत खात्यांत 9.64 कोटींचे संशयित व्यवहार
तपासात आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली आहे. ग्रो मोअर कंपनीच्या बाहेरील 13 व्यक्ती/कंपनी/फर्म यांच्या नावे एकूण 9 कोटी 64 लाख 28 हजार 694 रूपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. या रकमा नेमक्या कोणत्या हेतूने आणि कोणाच्या खात्यात वळवण्यात आल्या, याचा शोध आर्थिक गुन्हे शाखा घेत आहे.




