नाशिक | प्रतिनिधी
मांगीतुंगी येथे १५ जून पासून महोत्सव सुरु होत आहे. करोनानंतरचा हा पहिलाच उत्सव आहे. त्यामुळे या महोत्सवास राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह जगभरातील नागरिक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर याठिकाणी सुखसोयी पुरविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कायमस्वरूपी या सुविधा मिळाल्या पाहिजेत असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांडले.
ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मांगीतुंगी येथे लाईट, पाणी, मेडिकल युनिट्स सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. यासाठी आवश्यक पोलीस यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येईल. या पर्यटन स्थळी कायमस्वरूपी व्यवस्था होईल अशा सुविधा करण्याचे नियोजन करण्यात याव्यात.
यासोबतच अंजनेरी ट्रेकिंग इन्स्टिट्यूट त्र्यंबकेश्वर येथील प्रकल्पातील शिल्लक निधीतून आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. एम.टी.डी.सी.ने सदर प्रकल्प आपल्या ताब्यात घेऊन ट्रेकिंग इन्स्टिट्यूट संस्थेशी करार करून तातडीने सुरू करण्यात यावे. तसेच क्रीडा विभागातील साहसी क्रीडा विभाग कार्यान्वित करण्यात यावे.
गंगापूर येथील साहसी क्रीडा संकुल, कन्व्हेशन सेंटरची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन सुरू करावे.
गोवर्धन येथील कलाग्रामच्या रखडलेल्या कामांबाबत फेरप्रस्ताव शासनास तातडीने सादर करण्यात येऊन रस्त्याची कामे, विद्युतीकरण, पाणी पुरवठा यासह राहिलेली काम तातडीने सुरू करण्यात यावे.
पिंप्री सैय्यद येथे कृषी टर्मिनल मार्केटच्या जागेची हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येऊन प्रस्ताव सादर करण्यात यावा.सदरचा प्रकल्प पीपीपी तत्वावर विकसित करण्यात यावे.
नाशिक विमानतळावर पर्यटन सुविधा केंद्र विकसित करण्यात आलेले आहे. याठिकाणी पर्यटन सुविधा कक्षाची सुरवात करण्यात यावी. विमानतळावरील असलेल्या असुविधा तातडीने दूर करण्यात याव्यात. प्रवाश्यांच्या वाहनांना, बसेस ला प्रवेश देण्यात यावा. नाशिकची ओळख करून देणारे चित्र लावण्यात यावेत. विमानतळावर प्रवासी विमानसेवा अधिक वाढण्यासाठी उपाययोजना करण्यात यावे.
शिवणई येथे विकसित करण्यात येत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र परिसरातील रस्त्याची, पाण्याची आणि विजेची प्राथमिक सुविधांची कामे तातडीने करण्यात यावी. लवकरच या जागेचे भूमिपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे.
गोरेगाव चित्रपट सृष्टीच्या (Goregaon Film City Mumbai) धर्तीवर मुंढेगाव इगतपुरी (Mundegaon Igatpuri) येथे १०० एकर होऊन अधिक जागेवर विकसित करण्यात येत आहे. या चित्रपट सृष्टीच्या रखडलेल्या कामांबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेण्यात येईल. प्रस्तावातील त्रुटी दूर करून फेरप्रस्ताव सादर करण्यात यावे असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.