नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरातील (Nashik City) जुने नाशिक भागात काल झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेत घडलेल्या घटनेची माहिती घेतली. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हाधिकारी जलज शर्मा हे उपस्थित होते. या बैठकीत पोलिसांनी (Police) कालच्या प्रसंगाला संयमाने सामोरे जाताना केलेल्या उपाय योजनांचा आढावा पालकमंत्र्यांसमोर सादर केला.शहर परिसरात शांतता अबाधित राखण्यासाठी क्रूर प्रवृत्तींविरोधात कठोर पावले उचलण्याच्या सूचना पालकमंत्री भुसे यांनी यावेळी पोलिस प्रशासनाला केल्या. तसेच घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शासन करण्याचे आदेशही दादा भुसे यांनी पोलिसांना दिले.
हे देखील वाचा : Nashik Suicide News : शहरात तिघांनी संपविले जीवन
तसेच शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेला शांत करण्याच्या प्रयत्नात ५ पोलिस अधिकारी व ९ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार (Treatment) सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जखमी नागरिक आणि पोलिसांचीही मंत्री दादा भुसे यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. काल शहरात बांगलादेशमधील हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागल्याने दोनही गटांकडून दगडफेक झाली.यामुळे काहीकाळ शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी संवेदनशीलपणे ही घटना हाताळल्याने पोलीस प्रशासनाचे पालकमंत्री भुसे यांनी कौतुक केले.
हे देखील वाचा : “नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे कटकारस्थान करून…”; अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप
दरम्यान, यावेळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी ठिकठीकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत. त्यात दिसून येणार्या दोषींवर कंठोर कारवाई केली जाणार आहे. या दुर्घटनेत ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. तसेच येणार्या काही दिवसांत सर्वधर्मीय सण उत्सव सुरू होत असल्याने पोलिसांनी अधिक सतर्क राहावे आणि शहरातील नागरिकांनीही जबाबदारीचे भान ठेवत संयम व शांततेने सण उत्सव साजरे करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही मंत्री भुसे यांनी केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा