लोणी |वार्ताहर| Loni
यंदाच्या दिपावली सणावर नैसर्गिक संकटाचा सावट असले तरी या मंगलमय पर्वात नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी शेतकर्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. महायुती सरकारप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील शेतकर्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचे समाधान व्यक्त करत जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, आण्णासाहेब भोसले, डॉ. भास्करराव खर्डे, कैलास तांबे, शिवाजीराव जोंधळे, पोपटराव वाणी, किशोर नावंदर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे यांच्यासह सर्व संचालक आणि प्राचार्य उपस्थित होते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या मुख्य कार्यालयात चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील आणि धनश्रीताई विखे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. ना. राधाकृष्ण विखे पाटील, शालीनीताई विखे, कारखान्याचे व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ना. विखे पाटील यांच्या कुटुंबियांनी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
ना. विखे पाटील म्हणाले की, यंदाच्या वर्षी नैसर्गिक संकटाचा सावट असले तरी, शेतकर्यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकार खंबीरपणे उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राज्याला नैसर्गिक संकटात मदत करण्याचा निर्णय घेतला, त्याचे आपण स्वागत करतो. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लोणी येथील भेटी प्रसंगी राज्याला मदत करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने नैसर्गिक संकटात शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आणि 3200 कोटी रुपयांच्या पॅकेजची केवळ घोषणा केली नाही, तर त्याची अंमलबजावणी करून शेतकर्यांना दिलासा दिला. राज्य सरकारने अन्य पायाभूत सुविधा करण्यासाठीही 32 हजार कोटी रुपयांची मदत देण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. अहील्यानगर जिल्ह्यातील शेतकर्यांना महायुती सरकारच्या निर्णयाचा लाभ झाला असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाने अधिकार्यांनी सतर्कपणे केलेल्या कार्यवाहीबद्दल ना. विखे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आणि प्रशासनाच्या सहकार्याने दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यात मदतीचे पैसे वर्ग होऊ शकले.
ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटाला शेतकर्यांना सामोरे जावे लागले. परंतु या परिस्थितीवर मात करून आमचा शेतकरी बांधव पुन्हा नव्या उमेदीने उभा राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली. दिपावलीचे मंगल पर्व नवा आशेचा किरण घेऊन येणारे असते. संकटावर मात करून नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी हा दिपोत्सव निश्चितच सर्वांना बळ देईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी वस्तूसेवाकर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत देशातील जनतेला दिलासा दिला. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिवाळी सणात अर्थव्यवस्थेवर झाला. सण-उत्सवाच्या निमित्ताने स्थानिक विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्याच्या त्यांच्या आवाहनाला समाज घटकांनी दिलेला प्रतिसादही बाजारपेठांमध्ये पाहायला मिळाला, असे ना. विखे पाटील म्हणाले.




