Tuesday, October 22, 2024
Homeनगरविकासाची प्रक्रिया शेजारच्यांना देखवत नाही - महसूलमंत्री विखे पाटील

विकासाची प्रक्रिया शेजारच्यांना देखवत नाही – महसूलमंत्री विखे पाटील

राहाता |वार्ताहर| Rahata

आपल्या मतदार संघात सुरु असलेली विकासाची प्रक्रीया शेजारच्यांना आता देखवत नाही. त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली पण निर्णय करता आले नाहीत. आपण महसूल मंत्री पदाच्या काळात सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले. जिल्ह्याच्या आणि मतदार संघाच्या विकासासाठी प्रकल्प आणले. याची जेलसी आता शेजारच्यांना झाली आहे. त्यामुळेच येथे येऊन आपली विकासाची घडी उद्ध्वस्त करण्यासाठी आणि सामान्य माणसाच्या प्रपंचाला गालबोट लावण्याचे काम करीत आहेत. अशा बोलघेवड्या पुढार्‍यांना धडा शिकविण्याचे काम तुम्हाला आता करायचे आहे, असे रोखठोक प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

राहाता शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांना साहित्य वितरण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या जीवनात नवी उभारी देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. मात्र या योजनेला बदनाम करण्याचे काम महाविकास आघाडीकडून केले जात आहे. योजना बंद पाडू म्हणणार्‍यांना आता दारातही उभे करू नका असे आवाहन करून, महायुतीचे सरकारच सत्तेवर येणार आहे. या योजनेच्या अनुदानात वाढ करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. निळवंडे कालव्यावरून सातत्याने आपली बदनामी केली गेली. मात्र 2024 ला पाणी देणार हा शब्द मी दिला होता. तो पूर्ण झाला आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत या जिल्ह्यावर शेजारच्याच नेत्याने आणून बसविले. आज जायकवाडी भरल्याचे समाधान आहे. मात्र भविष्यात कायमस्वरुपी हा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे वळविण्यासाठी महायुती सरकारने काम सुरु केले असून, गोदावरी कालव्यांच्या नुतणीकरणासाठीच युती सरकारने 191 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सावळीविहीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय, अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, विमानतळाची नवीन इमारत या सर्व विकास प्रकल्पांमुळे आपल्या मतदार संघातील पुढच्या पिढीचे भवितव्यच अधिक यशस्वी होणार आहे. याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांचे भाषण झाले.

विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. ना. विखे पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी राहाता येथील दशक्रिया विधिघाट, मुस्लिम समाज बांधवांना दफन विधिसाठी जागा, नविन पोलीस ठाणे इमारत व पोलीस कर्मचाऱी वसाहत उभारणी तसेच नवनाथ मंदिराकडे जाणार्‍या कमानीचे व शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले.

राहाता नगरपरिषदेचे मुख्याधकारी वैभव लोंढे यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शहराच्या विविध विकास कामांना निधी मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानत शहरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली तसेच वीरभद्र देवस्थान ट्रस्टला क वर्ग दर्जा मिळवून दिल्याबद्दल व मंदिरातील अंतर्गत सजावट कामासाठी ना. विखे पाटील यांनी 30 लाखांची देणगी दिल्याबद्दल वीरभद्र ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने महसूलमंत्री विखे पाटील यांचा सत्कार केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या