अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाचे काम उत्तम, पारदर्शकपणे सुरू आहे. मात्र, याच बँकेच्या कारभाराबाबत जाणता राजाने चिंता व्यक्त केली होती. मात्र, आता नगर जिल्हा आणि जिल्हा बँकेची बाहेरच्यांनी चिंता करू नयेत. जिल्ह्यात ढवळाढवळ करून नका, असा टोला राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांचे नाव न घेता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या 68 व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, आ. विठ्ठलराव लंघे यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक मंडळ व नेते उपस्थित होते. जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत बोलतांना पालकमंत्री विखे पाटील यांनी जिल्हा बँकेच्या कारभाराचे कौतूक करत बँकेने जिल्ह्यातील सहकारी सोसायट्या आर्थिकदृष्ट्या समृध्द करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी सोसायटीच्या मनुष्यबळाला वेगवेगळे प्रशिक्षण द्यावे. एकवेळ बँकेचा नफा कमी झाला, तरी चालेल पण जिल्ह्यातील सहकार सोसायट्या आर्थिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे आवाहन केले.
शेवगाव- पाथर्डीसह मराठवाड्यातील अतिवृष्टीवर भाष्य करताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, आसमानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांना आधार देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. संकट मोठे असून सरकारच्यावतीने 31 लाख शेतकर्यांना 2 हजार 700 कोटींची मदत जाहिर केली आहे. नुकसानीचा आकडा हा प्राथमिक असून तो वाढणार आहे. नगर जिल्ह्यात पावसात विषमता असून दक्षिणेतील अनेक तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदीला ऐवढे पाणी आले की अनेक ठिकाणी पात्र शिल्लक राहिलेले नाही. नदी पात्रापासून एक किलो मीटरपर्यंत पूराच्या पाण्याचा वेढा होता. या काळात जिल्हा प्रशासनाने आणि मदत कार्य पथकाने नागरिकांचे प्राण वाचवण्याचे काम केले. मात्र, काही ठिकाणी दुदैवी प्रसंग घडले.
जिल्ह्यातील अतिवृष्टीची पाहणी झाल्यावर शेतकर्यांच्या वाढीव मदतीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीकडे अधिकच्या मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सरकारकडून 7-12 यावर असणार्या नोंदीनूसार पंचनामे करण्यास सांगण्यात आले आहे. नगर उत्तर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी नाशिकडील भागात चांगला पाऊस झालेला असल्याने जिल्ह्यातील धरणात मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे यंदा जायकवाडीत पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. तसेच जायकवाडीतील पाण्याचे नियोजन केल्यामुळे धरणातील 30 टक्के पाणी शिल्लक राहणार आहे. जलसंपदा विभागाचा मंत्री असेपर्यंत जायकवाडीत नगरच्या धरणातून पाणी सोडण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन वर्षात नगर पाण्याबाबत सक्षम करणार
नगर जिल्हा पुढील दोन वर्षात शेतीच्या पाण्यासाठी सक्षम करणार आहे. गोदावरी खोर्यात जादाचे 60 टीएमसी पाणी वळवण्यात येणार आहे. यात मुळा धरणात 15 आणि भंडारदरा धरणात 12 टीएमसी पाणी आणण्यात येणार आहे. यासाठी 70 हजार कोटींची गरज आहे. हा निधी उभारण्यासाठी देश पातळीवर कंपन्या आणि बँकांकडे विचारणा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. पुढील काही वर्षात नगर जिल्हा दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प मंत्री विखे पाटील यांनी बोलून दाखवला.
केटीवेअरवर स्वयंचलित यंत्रणा
नगर जिल्ह्यासह या पुढे राज्यातील केटीवेअर दुरूस्तीसाठी निधी दिला जाणार नाही. याबाबत राज्य पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या पुढे नगरसह राज्यातील केटीवेअरवर स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात येणार असून यामुळे पाणी सोडण्यासाठी दरवेळी फळ्या काढण्याची कसरत करावी लागणार नाही. सिंचन व्यवस्थेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकरक्कमी 550 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पारनेर तालुक्यातील पाणी प्रश्न मार्गी लावणार. लवकरच साकाळाई पाणी योजनेचे भूमीपूजन करणार असल्याची घोषणा पालकमंत्री विखे यांनी करत त्यांच्या एक महिन्यांचे वेतन अतिवृष्टी बाधितांना देण्यासाठी मुख्यमंत्री साहयता फंडाकडे देणार असल्याचे सांगितले.
कर्जमाफीची मागणी चुकीची नाही
नगरसह राज्यातील शेतकर्यांनी केलेली कर्जमाफीची मागणी चुकीची नाही. विखे यांच्या भाषणाच्या वेळी बँकेच्या एका वयोवृध्द शेतकर्याने नियमित कर्जभरणार्या शेतकर्यांना मदत न मिळाल्याने त्यांनी काय करावे? अशी विचारणा केली. त्यावर पालकमंत्री विखे यांनी थकीत कर्जदारांच्या मदतीसोबत नियमित कर्जदारांच्या मदतीच्या मागणीशी सहमत असून संबंधीतांच्या भावना मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचवतो, या शब्दात प्रतिसाद दिला.




