नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत कच्छ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून हेरगिरी करणारा आरोग्य कर्मचारी सहदेव सिंह गोहिल याला अटक केली आहे. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भारतीय सीमा, बीएसएफ आणि भारतीय नौदलाच्या कारवाया, परिसराचे फोटो आणि इतर संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवली होती. त्याने गुजरातच्या अनेक सीमावर्ती भागांची माहितीही पाठवत होता.
गुजरात एटीएसचे एसपी के. सिद्धार्थ यांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली होती की सहदेव सिंह गोहिल पाकिस्तानमधल्या एजंट्सला बीएसएफ आणि हवाई दलाशी संबंधित माहिती पाठवत आहे. त्याला १ मे रोजी प्राथमिक चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
चौकशीदरम्यान, सहदेव सिंह जून-जुलै २०२३ पासून ‘अदिती भारद्वाज’ नावाच्या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. दोघांमध्ये व्हॉट्सएपवर संभाषण सुरू होते. जानेवारी २०२५ मध्ये सहदेव सिंहने त्याच्या आधार कार्डचा वापर करून एक भारतीय सिम कार्ड मिळवले आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याने ते सिम कार्ड ओटीपीद्वारे आदिती भारद्वाजला दिले, ज्याद्वारे व्हॉट्सएप कॉलिंग आणि मेसेजेस सुरु होते.
सहदेव सिंहच्या चौकशीदरम्यान असेही उघड झाले की, सहदेवला एका अज्ञात व्यक्तीमार्फत ४० हजार रुपये देण्यात येत होते. त्याचा मोबाईल फोन फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) मध्ये पाठवण्यात आला आहे. व्हॉट्सअॅप नंबरची तपासणी केल्यावर ‘अदिती भारद्वाज’च्या नावाने वापरला जाणारा नंबर पाकिस्तानमधून ऑपरेट होत असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, गुजरात एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या हेरगिरी नेटवर्कमध्ये आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. सुरक्षा एजन्सी आता कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल उपकरणांची चौकशी करत आहेत.
गुजरात एटीएसने सहदेव सिंह गोहिल आणि पाकिस्तानी एजंट अदिती भारद्वाज यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६१ आणि १४८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहदेव सिंह गोहिलला अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा