अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पश्चिम आशियातील आखाती परिसरात इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्या सुरु असलेल्या युद्धाच्या झळा आता महाराष्ट्राला आणि नगर जिल्ह्याला जाणवायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इंधनाचे आणि गॅसचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी सीएनजी आणि एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आता युद्धामुळे पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल पंपचालकांना मेसेज पाठवले आहेत. युद्ध पेटल्यामुळे येणार्या खनिज तेलाच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोज पेट्रोल, डिझेल हवे असेल तर अॅडव्हान्स पैसे भरा. हे पैसे भरल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरु राहिल, अशा सूचना संबंधित पेट्रोल पंप चालकांना पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, यापूर्वी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल पंपचालकांना काही दिवसांचे क्रेडिट मिळत होते. मात्र, आता पैसे भरल्याशिवाय पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही, असा मेसेज तेल कंपन्यांनी पाठवला आहे. दुसरीकडे नगर जिल्ह्यात पुढील 70 दिवस पुरेल ऐवढा पेट्रोल आणि डिजेलचा साठा शिल्लक आहे. युध्द लांबल्यास त्याचा काहीचा परिणाम होणार असल्याची शक्यता असली तरी नागरिकांनी पॅनिक होवू नयेत, असे आवाहन जिल्हा पेट्रोल पंप चालक संघटनेनेचे माजी अध्यक्ष चारूदत्त पवार यांनी केले आहे. इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे पश्चिम आशियातून होणारी इंधनाची वाहतूक बंद झाली आहे. कतारमधून होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात इंधन आणीबाणी लागू होण्याची चिन्हं दिसत आहेत.
जिल्ह्यात 63 हजार 450 घरगुती सिलिंडरचा साठा
उद्या जिल्हा प्रशासनाने बोलावली बैठक
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाचे दुष्परिणाम भारतात जाणवू लागले आहेत. केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना एलपीजी सिलिंडर देण्यावर बंदी घातली आहे. परंतु अहिल्यानगर जिल्ह्यात सद्यस्थितीत गोदामांमध्ये 63 हजार 450 घरगुती सिलिंडरचा (14.2 किलो) साठा उपलब्ध आहे. हा साठा किती दिवस पुरेल याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नसली तरी सोमवारी जिल्हा प्रशासनाने याबाबत आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, शनिवारी इंधन कंपन्यांकडून घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 60 तर व्यावसायिक वापराच्या सिलिंडरसाठी 115 रूपये वाढ जाहिर केली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एलपीजी गॅस वितरणाची सद्यस्थिती प्रशासनाकडून मागवण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या तीन प्रमुख कंपन्यांचे एकूण 109 वितरक कार्यरत आहेत. या वितरकांकडे नोंदणीकृत 13 लाख 60 हजार 773 घरगुती ग्राहक आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी 30 हजार 36 घरगुती सिलिंडरचे वितरण केले जाते. सद्यस्थितीला गोदामांमध्ये एकूण 63 हजार 450 घरगुती सिलिंडरचा साठा उपलब्ध आहे. हा साठा किती दिवस पुरेल याबाबत शंका असतांना गॅस कंपनीचे समन्वयक राजकुमार मिश्रा यांनी महिनाभर पुरेल एवढा साठा असल्याचा दावा केला आहे. जिल्ह्यातील गॅस सिलिंडर साठ्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया हे सोमवारी गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून आढावा घेणार आहेत. सध्या जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा चांगला साठा असून महिनाभर तुटवडा निर्माण होणार नसल्याचा दावा जिल्हा समन्वयक मिश्रा यांनी केला.
कंपनीनिहाय सिलिंडर साठा
बीपीसीएल 42 वितरक संख्या आणि ग्राहक संख्या 7,87,469.
एचपीसीएल 36 वितरक आणि ग्राहक संख्या 4,77,630.
आयओसीएल 31 वितरक आणि ग्राहक संख्या 95,674.
माहिती देण्यास टाळाटाळ
नगर जिल्ह्यात किती घरगुती गॅसचे ग्राहक आहेत. यात शासकीय घरगुती गॅस कंपनीसह खासगी कंपनीच्या ग्राहकांची संख्या किती. त्यांना महिन्यांला किती टाक्यांची गरज आहे. जिल्ह्यात सध्या किती घरगुती गॅसचा साठा उपलब्ध आहे, याबाबतची आकडेवारी जिल्हास्तरावर उपलब्ध नसल्याचे एलपीजी गॅस कंपनीचे समन्वयक मिश्रा यांनी सांगितले. तसेच या माहितीसाठी त्यांनी मुंबई कार्यालयाकडे बोट दाखवले. तसेच जिल्ह्यात व्यवसायिक गॅसचा वापर करणारे ग्राहक, औद्योगिकरण कामासाठी वापर करणार्यांची आकडेवारी देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले.
व्यवसायिक गॅसचा पुरवठा बंद ?
जिल्ह्यातील हॉटेलसह व्यवसायिक कारणासाठी करण्यात येणार्या एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. याबाबत गॅस कंपनीकडून अधिकृत माहिती देण्यात येत नसली तरी जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांनी यास दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात पुढील काळात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून
पालकमंत्री विखे पाटील यांची माहिती
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
इराण आणि इस्राईल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद राज्यात उमटतांना दिसत आहेत. यामुळे मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये इंधनासह गॅसचा प्रश्न निर्माण होण्याची स्थिती आहे. मात्र, त्यावर केंद्र व राज्य सरकार लक्ष ठेवून आहेत. नगर जिल्ह्यात सध्या इंधन व गॅसची तुटवडा जाणवणार नाही, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नगरमध्ये मध्यमांशी बोलतांना विखे पाटील म्हणाले, आखाती देशात सुरू असलेल्या युध्दामुळे राज्यातील मोठ्या शहरांमध्ये इंधन दर वाढीसह टंचाईची होवू शकते. नगरमध्ये मात्र तशी परिस्थिती नाही. यामुळे व्यवसायिक गॅसचा पुरवठा बंद करणे अथवा कोठा कमी करणे असे निर्णय घेतलेले नाहीत. मात्र, युध्दामुळे काहीही होवू शकते. त्यावर केंद्र व राज्य सरकार लक्ष ठेवून आहेत, असे मंत्री विखे यांनी यावेळी सांगितले.





