Friday, May 3, 2024
Homeनगरगुंजाळेत गोळीबार, एक तरूण ठार

गुंजाळेत गोळीबार, एक तरूण ठार

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील एका टेलरींग दुकानात गोळीबार झाल्याचा आवाज आला. अन् तेथील प्रदीप एकनाथ पागिरे हा पंचवीस वर्षाचा तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे भीषण दृश्य पागिरे कुटुंबियांना पहायला मिळाले. दरम्यान, हा घातपात की आत्महत्या? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून घटनेबाबत परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ही घटना काल सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राहुरी पोलिसांनी मयत पागिरे याचा मित्र अक्षय कारभारी नवले या तरूणास संशयित म्हणून ताब्यात घेतले असून या घटनेची कसून चौकशी चालू असल्याची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

तर त्या मित्राकडे एक गावठी कट्टा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे राहुरी तालुक्याचा थरकाप उडाला आहे. पागिरे यांचा मृत्यू संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे.

घटनेची खबर मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हा अन्वेषण, नगर येथील अनिल कटके यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी यावेळी नगर येथून ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाला तातडीने पाचारण करण्यात आले.

मयत पागिरे याचे गुंजाळे गावात भरवस्तीत टेलरींगचे दुकान असून पाठीमागील बाजूला पागिरे यांचे घर आहे. काल सकाळी पागिरे हे आपल्या दुकानात काम करीत असताना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा आवाज आला. पागिरे यांचे कुटुंबिय आवाजाच्या दिशेने दुकानाकडे धावले. त्यांना प्रदीप पागिरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी अक्षय नवले हा तेथेच पागिरे यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांशी बोलत असल्याची माहिती पागिरे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली. या घटनेची खबर पागिरे यांचे मोठे बंधू अविनाश पागिरे यांना देण्यात आली. त्यावेळी ते आपल्या शेतीवर होते. त्यांनीही तातडीने घरी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पागिरे यांना अक्षय नवले याने तातडीने नगर येथील खासगी रूग्णालयात नेले. मात्र, त्यांना मयत घोषित करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या पथकात पोहेकॉ. चंद्रकांत बर्‍हाटे, दिनकर चव्हाण, आदिनाथ पालवे, संतोष राठोड, सचित ताजणे, बोडखे, आरोळे, आदींचा समावेश होता.

दरम्यान, मयत पागिरे यांच्याकडे गावठी कट्टा आला कसा? अक्षय नवले त्याचवेळी घटनास्थळी हजर कसा? योगायोग की नियोजन? घटना घडल्यानंतर दुकानातील रक्त तातडीने का पुसण्यात आले? तर घटनेनंतर दुकानालाही तातडीने कुलूप लावण्यात आले. तर मयत पागिरे यास नगर येथे खासेगी वाहनातून रूग्णालयात नेत असताना त्या मित्राने गावठी कट्टा बरोबर का नेला? अशा चर्चेला उधाण आले आहे. राहुरी पोलिसांनी अक्षय नवले यास नगरहून परतताना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या