शिर्डी। प्रतिनिधी
शिर्डीमध्ये (Shirdi) गुरूपौर्णिमा (Gurupaurnima) मोठ्या उत्सहात साजरी केली जात आहे. साईबाबांना गुरू स्वरूप मानत हजारो साईभक्त गुरूचरणी नतमस्तक होतात.
आज गुरूपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई समाधी मंदिर (Sai Baba Temple) भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थाने घेतला आहे. साई समाधी मंदिरासह भाविक गुरूस्थान मंदिरातही दर्शनासाठी गर्दी केल्याच पहायला मिळत आहे. देशभरातील आलेल्या साई भक्तांमुळे दर्शन रांगा फुलल्या असून भाविकांची मांदीयाळी दिसून येत आहे.
हे ही वाचा : शिर्डीत ‘ते’ दहशतवादी नव्हे बनावट सोने विकणारे
साईबाबांच्या मंदिरात काल सुरू झालेल्या साईसचरित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती आज करण्यात आली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आणि इंग्लिश मिडीअम स्कूलचे प्राचार्य आसीफ तांबोळी यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने दानशूर साईभक्त सुभा पै. अमेरीका यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट व साईराज डेकोरेटर्स, मुंबई यांनी मंदिर व परिसरात केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने साईभक्तांचे लक्ष वेधुन घेत आहे.
हे ही वाचा : राहाता तालुक्यातील विद्यार्थी गणवेशाच्या प्रतिक्षेत
सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या नगरीमध्ये अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. साईबाबांच्या हयातीपासून शिर्डीमध्ये गुरूपौर्णिमा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. तिच परंपरा आजतागायत जपली जाते आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवाचे विशेष महत्त्व असून साईबाबा बालफकिराच्या रुपात ज्या निमवृक्षाखाली प्रकटले त्या जागेला गुरूस्थान म्हणून ओळखले जाते. साईबाबा त्या निमवृक्षाखाली ध्यान धारणा करत असत. गुरूस्थानाजवळील त्या निमवृक्षाला प्रदक्षिणा घालून भाविक गुरूला नमन करत असून साई नामाच्या जयघोषाने परिसर दुमदूमून गेला आहे.
हे ही वाचा : दारणा, भाम निम्मे भरले !