– बाजीराव सोनवणे
स्वामी समर्थ सेवामार्गाचे अर्ध्वयू गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे (Gurumauli Annasaheb More) यांचा आज (२८ मार्च) ६७ वा वाढदिवस! त्यानिमित्त गुरुमाऊलींच्या आध्यात्मिक कार्याची ओळख….
गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम: ॥
नित्यसेवा म्हटली जाणारी ही प्रार्थना श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराजांच्या (Gurudev Dattatreya Maharaj) स्वरुपाचा परिचय परब्रह्माच्या ज्ञानस्वरुपाची दिव्यधारणा, स्वत:मधल्या ज्ञान केंद्राचे चैतन्यात्मक स्फुरण अशा विविध प्रचितींचे भांडार आहे. श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ महाराज, पिठले महाराज, सद्गुरु मोरेदादा या दत्तात्रेय महाराजांच्या वारसदारांनी मानवाची अज्ञान, भ्रांती, विकार नष्ट केले.
त्याला त्याच्या खर्या स्वरुपाची जाणीव करुन दिली. या थोर गुरुपरंपरेतील गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे समर्थपणे ही परंपरा पुढे घेऊन जात आहेत. आज लाखो सेवेकऱ्यांनी गुरू व माऊली असे आपल्या आयुष्यातील सर्वोच्च स्थान देऊन ते गुरुमाऊलींच्या चरणीलीन झाले आहेत. आपण कोणी थोर, अलौकीक पुरुष आहोत याची आपल्या भक्तांना जराही जाणीव होणार नाही, अशा पद्धतीने आचार ठेवून गुरुमाऊली अण्णासाहेब सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराज (Sri Swami Samarth Maharaj) म्हणजेच दत्तात्रेय महाराजांच्या सान्निध्यात घेऊन जात आहेत.
गुरुमाऊलींच्या माध्यमातून आज लहानथोर, महिला-पुरुष सेवेकरी या थोर विश्वव्यापी शक्तीच्या निकट जाऊन त्यांचे अणूरेणू बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. सेवेकर्यांना ज्ञानानुभव देऊन अध्यात्म व जीवनाची अवघड वाट सोपी-सरळ करुन देणारे गुरुमाऊली दत्तात्रेय महाराजांचे देहरुप आविष्कार असल्याचा विश्वास सेवेकर्यांमध्ये आहे.
त्या विश्वासाच्या जोरावरच ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ असा गोड अनुभव सेवेकरी घेत आहेत. परब्रह्मापर्यंत आपले बोट धरुन घेऊन जाणरारे गुरुमाऊलीच सेवेकर्यांच्या दृष्टीने परब्रह्म बनले आहेत. शिष्यांच्या पापतापाचे निराकरण करुन ईश्वराची प्राप्ती करुन देतात ते ‘गुरू’ आण्णासाहेब सर्वांचे गुरुमाऊली आहेत. त्यांच्या ठायी गुरु आहेत आणि प्रत्येक सेवेकर्याची माताही आहे.
आईप्रमाणे प्रत्येक शिष्याची शिस्तबद्ध अध्यात्मिक प्रगती ते करवून घेतात. आंतरिक कळवळ्याने ज्ञानाचा, बोधाचा वारसा देऊन त्यांच्या सर्व आपत्ती, अरिष्टांचे निवारण करतात. प्रसंगी माया, प्रेम देऊन वाट मुकलेल्या, गोंधळात पडलेल्या शिष्यालाही आपल्या कृपाछत्राखाली आश्रय देतात. देहधारी गुरुमाऊलींच्या माध्यमातून गुरुतत्वाची चैतन्य स्पंदने शिष्याच्या मनापर्यंत, आत्म्यापर्यंत पोहोचतात. गुरुमाऊलींच्या गुरुकृपेच्या वर्षावात चिंब होण्यासाठी व गुरुतत्वाची चैतन्य स्पंदने अनुभवण्यासाठी दिंडोरी तसेच त्र्यंबकेश्वरसह सर्व समर्थ केंद्रांवर सेवेकऱ्यांची नेहमीच गर्दी असते.
दिंडोरीतून (Dindori) उगम पावलेल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवामार्ग म्हणजे गुरुप्रणित मार्गच आहे. गुरुंकडे फक्त आध्यात्मिक दृष्टीनेच पाहून कसे चालेल? गुरुंचे कार्य राष्ट्रनिर्मिती, राष्ट्रउभारणी, सामूहिक सहभावना व सामाजिक बांधिलकीचे असते. म्हणून तर या कार्यात उजाळा देणारा आजचा दिवस खास आहे. गुरुप्रणित मार्गात सामाजिक कर्तव्य, सामाजिक जाण, राष्ट्रप्रेम, एकात्मता यावर सातत्याने प्रबोधन केले जाते.
इतरांच्या अडचणी, प्रश्न, दु:खे, वेदना याविषयी निर्माण झालेला कळवळा, त्यासाठी उस्फूर्तपणे देऊ केलेला मदतीचा हात, निरपेक्ष, सहकार्य, सेवामूल्य म्हणून केलेले सामाजिक कार्य येथे निरंतर सुरू आहे. सेवामार्ग म्हणजे सहानुभूती व सहिष्णूतेचा झराच आहे. हरवलेले माणूसपण शोधून त्याची जपणूक करण्याची मानसिकता येथे जोपासली जाते.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच अध्यात्मसेवा दिली जाते. बालकांवर संस्कार करण्यापासून शास्त्रांच्या प्रशिक्षणापर्यंत, सांस्कृतिक जागरणापासून स्वयंरोजगार प्रशिक्षणापर्यंत, शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंत, संशोधन ते विचारमंथन लोकहित व राष्ट्रहिताच्या कार्यात येथे प्रत्येकाला आध्यात्मिक वृत्तीने आपल्या क्षमतेनुसार सहभाग घेता येतो.
स्त्री-पुरुष, शिक्षित-अशिक्षित, मालक-नोकर, शिपाई, अधिकारी, ग्रामीण शहरी अशा सर्वांची आंतरिक क्षमता, कर्तबगारी जागृत करुन समाजोद्धारासाठी त्याचा उत्तमपणे उपयोग गुरुप्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून करुन घेतला जात आहे. कर्मकांडाचे अवास्तव स्तोम, प्रदर्शन, सोवळे-ओवळे येथे नाही. महिलांना तर येथे खास दर्जा आहे. त्यांना ज्ञानार्जनाचे, सेवेचे, ज्ञानदानाचे व नेतृत्वाचे सर्व अधिकार दिंडोरीसह सर्व केंद्रांतून देण्यात आले आहेत.
अध्यात्म म्हणजे राष्ट्रधर्म, मानवताधर्म, लोक उद्बोधन, शाश्वत ज्ञानानुसंधान व सुगम संज्ञापन, नीतीमूल्यांची जोपासना, सामाजिक सद्भावना, आपुलकी व सामाजिक बांधिलकी होय. अध्यात्म म्हणजे मानव गौरव! मानव अस्मिता वाढवणारी संस्कार-चळवळ होय.
या संस्कारातून अंतर्बाह्य अधिष्ठित ईश्वराशी एकरुप होण्याची वृत्ती म्हणजे अध्यात्मिक जगणे होय. या संस्कार चळवळीत नव्याने दाखल होण्यासाठी व जे जुनेच आहेत त्यांना आपल्या कार्यकक्षा रुंदावण्यासाठी आणि त्यांच्या क्षमतावृद्धीसाठी गुरुमाऊली सदैव प्रयत्नशील आहेत.