अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात गुटख्याचा बेकायदेशीर धंदा पुन्हा जोमात सुरू असून, परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जाऊन त्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे जिल्हा पोलीस दलातील काही अंमलदारच या गुटखा रॅकेटला पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केला.
यामुळे जिल्ह्यात अवैध गुटखा साखळीला पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याचे समोर आले आहे. आ. खताळ यांनी विधानभवनात ‘चौधरी’ आणि ‘घोडके’ या दोन अंमलदारांची नावे स्पष्टपणे घेत कारवाईची मागणी केली. दोन्ही अंमलदारांचे वरिष्ठ अधिकार्यांशी विशेष संबंध असल्याच्या चर्चांनी जिल्हा पोलिसांत खळबळ उडाली आहे. ‘चौधरी’ नावाचा कर्मचारी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात असून उत्तर नगर विभागात गुटख्याचे रॅकेट त्याच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा आहे. तर, ‘घोडके’ हा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असून वरिष्ठ अधिकार्यांचा निकटवर्ती मानला जातो.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर परि. उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून गुटखा-मावा विरोधातील मोठ्या प्रमाणातील कारवाया राबवल्या होत्या.
त्या काळात जिल्ह्यातील गुटखा विक्री जवळपास पूर्णतः बंद करण्यात आली होती. परंतु परिक्षणार्थी कार्यकाळ संपल्यानंतर खाडे यांची बदली झाली आणि या कारवाया झपाट्याने मंदावल्या. काही आठवड्यांतच गुटखा-माव्याच्या विक्रीचे जाळे पुन्हा उघडपणे सुरू झाल्याचे दिसू लागले. जिल्ह्यात गुटखा कारवाई करताना पोलीस ठाणे व एलसीबीकडून प्रत्यक्षात मोठ्या डिलरांवर कारवाई न होता, फक्त किरकोळ विक्रेत्यांवर जुजबी कारवाई होत आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस दलातील काही अंमलदारांच्या आश्रयाने गुटखा व्यवसाय फोफावत असल्याची बाब थेट विधानभवनात उजेडात आली. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचल्याची चर्चा प्रशासनात आणि जनतेत चांगलीच रंगली आहे.
गृहराज्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन
आ. खताळ यांनी दोन अंमलदारच रॅकेटला आश्रय देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या दोघांविषयी त्यांनी थेट विधानभवनात कारवाईची मागणी केली. आ. खताळ यांच्या आरोपांवर सभागृहात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया देताना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. यामुळे आता या दोन्ही अंमलदारांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




