जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed
जामखेड पोलिसांनी जामखेड-कर्जत रोडवरील अरणगाव शिवारात अवैध गुटखा भरलेला टॅम्पो पकडला. पोलिसांनी अवैध गुटखा व टॅम्पोसह एकूण 52 लाख 94 हजार 640 रु. मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे, पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे, चालक महादेव मिसाळ व होमगार्ड संदिप चव्हाण यांच्या गस्ती पथकाला जाामखेड-माहीजळगाव रोडवरील अरणगाव शिवारात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक संशयित आयशर टॅम्पो माहीजळगावकडून जामखेडच्या दिशेने जात असलेला दिसून आला.
यानंतर टेम्पो पोलीसांनी अडवून एका पेट्रोल पंपाजवळ थांबवला व टॅम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये 34 लाख 94 हजार 640 रु. किमतीचा अवैध पानमसाला, गुटखा व तंबाखूचा माल आढळून आला. पोलिसांनी 18 लाख रु. किमतीचा आयशर टॅम्पो व 34 लाख 94 हजार 640 रु. किमतीचा अवैध गुटखा असा एकूण 52 लाख 94 हजार 640 रु. मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी टेम्पो चालक वैभव अशोक घायाळ (वय 26 वर्षे, रा. गवळवाडी, ता. पाटोदा, जिल्हा बीड) यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





