हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgaon
राहाता तालुक्यातील हनुमंतगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अखेर प्रशासनाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात यांत्रिक साधनांची जप्ती केली. रात्री उशिरा महसूल विभाग आणि लोणी पोलिसांनी संयुक्त छापेमारी करत नदीपात्रात सुरू असलेली वाळूतस्करी रोखली. या कारवाईत फरांडी मशीन, ट्रॅक्टर, पाइप्स, मोटारपंप यांसह वाळू उपशासाठी वापरलेली साधने ताब्यात घेण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंतगावाजवळील नदीपात्रात गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खोदकाम सुरू होते. पारंपरिक पद्धतीऐवजी फरांडी मशीनच्या सहाय्याने नदीच्या तळाशी खोलवरून वाळू उपसली जाते आणि जेसीबीने वाळू भरून ती विस ते पंचवीस टिप्परच्या साहाय्याने वाहतूक केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला दिली होती. तक्रारींनंतरही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा जोरदार पाठपुरावा केल्यानंतरच ही कारवाई उशिरा का होईना मात्र झाली. पथक घटनास्थळी पोहोचल्यावर उपसा सुरू असलेली फरांडी मशीन पूर्णपणे कार्यरत अवस्थेत आढळली. ट्रॅक्टर नदीकाठावर तयार स्थितीत असल्याचेही पथकाला दिसले. सर्व साधनांचा पंचनामा करून ती जप्त करण्यात आली असून ती लोणी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
या कारवाईनंतर राहाता तहसीलदारांनी सांगितले, जप्त वाहनधारकांना नोटिस देण्यात येणार असून नियमानुसार दंडात्मक कारवाई अनिवार्यपणे केली जाईल. मात्र ग्रामस्थांनी प्रशासनाची ही कारवाई उशिरा, अपुरी आणि बाह्यदर्शी असल्याची प्रतिक्रिया दिली. दिवसाला शेकडो ब्रास वाळू बाहेर जाते; नदीपात्राचा संपूर्ण नकाशाच बदलला आहे. एक-दोन मशीन पकडून हा माफिया बंद पडणार नाही, अशी टीका नागरिकांनी केली. तसेच नदीकिनारी अजूनही वाळूचे ढिगारे असून ते जप्त करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांकडे उच्चस्तरीय चौकशी, संबंधित महसूल अधिकार्यांची जबाबदारी ठरवणे आणि वाळू माफियांवर कठोर गुन्हे नोंदवण्याची मागणी केली आहे. हनुमंतगावात होत असलेला अवैध वाळू उपसा हा पर्यावरण, भूजलपातळी आणि गावाच्या सुरक्षिततेस गंभीर धोका ठरू लागला असून आजची कारवाई हा फक्त पहिला टप्पा असल्याची भूमिका जागरूक नागरिकांनी घेतली आहे.




