नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये मोठी घडामोड घडली आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाची अनुभवी कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हरमनप्रीतने आपल्या निर्णयाची घोषणा केली. विशेष म्हणजे, हा निर्णय BCCIच्या आढावा बैठकीनंतर अवघ्या एका दिवसात समोर आला आहे. त्यामुळे हरमनप्रीतच्या निर्णयामागे नेमके काय घडले, याची चर्चा क्रिकेटविश्वात सुरू झाली आहे.
BCCIच्या बैठकीत नेमकं काय झालं?
भारतीय महिला संघाच्या अलीकडील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे BCCIची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला BCCI सचिव देवजीत सैकिया, हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार उपस्थित होते. संघाची कामगिरी, पुढील वाटचाल आणि नेतृत्वासह विविध बाबींवर या बैठकीत चर्चा झाली आहे.
BCCIच्या या आढावा बैठकीला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना देखील उपस्थित होती. त्यामुळे आगामी काळात भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मंधानाकडे सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘मी माझे कर्तव्य पूर्ण केले’
हा निर्णय घेणे सोपे नव्हते. यात अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि असे काही क्षण सामावलेले आहेत जे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. मी या संघासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटसाठी माझे सर्वस्व रक्त, घाम आणि वेळ अर्पण केले आहे. काही वेळा मला माझ्या स्वतःच्या खेळाशी आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेशी तडजोड करावी लागली. असेही क्षण आले जेव्हा मला माझी वैयक्तिक कामगिरी, माझी प्रगती आणि माझ्या वैयक्तिक इच्छा बाजूला ठेवाव्या लागल्या, कारण माझा असा विश्वास होता की संघ सर्वात महत्त्वाचा आहे.
हरमनप्रीत कौरने पोस्टमध्ये लिहिले कर्णधार असताना तिला अनेक कठीण निर्णय घ्यावे लागले, असे निर्णय जे नेहमीच सहज समजण्यासारखे किंवा सोपे नव्हते आणि ज्यांची किंमत तिला कधीकधी वैयक्तिक पातळीवर मोजावी लागली. हरमनप्रीत म्हणाली की, मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे एकच उद्देश होता, संघाला अधिक सक्षम करणे आणि इतर खेळाडूंना प्रगती करण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि स्वतःचे सर्वोत्तम रूप घडवण्याची संधी देणे. मी सर्व काही अनुभवले आहे. मी अत्यंत कठीण क्षण पाहिले आहेत. हृदयद्रावक प्रसंग, टीका, शंका आणि असे दिवस जेव्हा काहीच आमच्या मनासारखे घडले नाही. आणि मी सर्वोत्तम क्षणही पाहिले आहेत, विजय, जल्लोष, देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान आणि असे क्षण जेव्हा केलेल्या प्रत्येक त्यागाचे सार्थक झाले.
आज मी भावूक होऊन, पण मनाच्या शांततेसह कर्णधारपदावरून पायउतार होत आहे, कारण माझा ठाम विश्वास आहे की माझा संघ आता एका चांगल्या स्थितीत आहे. हा संघ गुणवत्ता, चारित्र्य, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्य असलेला संघ आहे, ज्याची प्रगती पाहण्यासाठी आणि ज्याचा एक भाग राहण्यासाठी मी उत्सुक आहे. मला वाटते की मी माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. मी या संघासाठी माझे सर्वस्व दिले. मी अभिमानाने ही जबाबदारी पेलली आणि भारतीय महिला क्रिकेटचे नेतृत्व करण्याची विशेष संधी मिळाल्याबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन, असं हरमनप्रीत कौर म्हणाली. कर्णधारपदाचा कार्यकाळ आज संपत असेल, पण भारतीय क्रिकेटवरील माझे प्रेम कधीच संपणार नाही. माझ्या सुख-दुःखाच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या प्रत्येक सहकारी खेळाडूचे, प्रशिक्षकाचे, सपोर्ट स्टाफ सदस्याचे, व्यवस्थापनातील अधिकाऱ्याचे, बीसीसीआयचे, कुटुंबातील सदस्याचे आणि चाहत्याचे मी आभार मानते. रक्त, घाम, त्याग, अभिमान मी हे सर्व काही दिले. आता, केवळ खेळावरील प्रेमापोटी पुन्हा खेळण्यासाठी मी सज्ज आहे. कर्णधारपदाचा अध्याय संपत आहे, पण माझा प्रवास सुरूच राहील, असं हरमनप्रीत कौरने स्पष्ट केलं.
हरमनप्रीतच्या नेतृत्वाचा सुवर्णकाळ
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने अलीकडच्या काळात अनेक मोठी कामगिरी केली आहे. तिच्या नेतृत्वाखाली संघाने आशिया कप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तसेच 2025 मध्ये भारतात झालेल्या महिला वनडे विश्वचषकात भारतीय संघाने ऐतिहासिक विजेतेपद मिळवले.
हरमनप्रीत कौरची कामगिरी
हरमनप्रीत कौर 37 वर्षांची असून, तिने जवळपास 10 वर्षे भारतीय महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं. 2016 मध्ये तिला प्रथम टी-20 संघाची कर्णधार बनवण्यात आलं.तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक आशिया कप स्पर्धांमध्ये यश मिळवलं. तसेच 2025 च्या वनडे वर्ल्ड कप आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकलं. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात तिचं कर्णधारपद आणि योगदान दीर्घकाळ लक्षात राहील.




