नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
हरियाणा आणि जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. थोड्याच वेळात या दोन्ही राज्यातील निकालांचे चित्र स्पष्ट होईल. सत्ता कुणाच्या हाती आली हे स्पष्ट होईल. सकाळनंतर आता दुपारच्या अंदाजानुसार, हरियाणात भाजपाने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या पारड्यात बहुमताचा आकडा गेला आहे. या निवडणुकीत कुस्तीपट्टू विनेश फोगट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.
आज मतमोजणीला सुरुवातीपासून विनेश फोगट आणि भाजपचे योगेश बैरागी यांच्यात थेट लढत असून सध्याच्या ट्रेंडनुसार ऑलिम्पिक पदकविजेती विनेशने प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवारावर ५००० मतांची आघाडी घेतली आहे. विनेश फोगाटच्या विरोधात भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी रिंगणात आहेत. जुलाना विधानसभा जागेवर एकूण १२ उमेदवार मैदानात उतरले आहेत. यामध्ये सध्या भाजपचे योगेश बैरागी जुलाना विधानसभेतून पिछाडीवर आहेत.
विनेश फोगाट ही एक कुस्तीपट्टू जिने अनेक आखाडे गाजवले आणि मग कुश्तीच्या मॅट गाठली आणि तेही गाजवले. विनेश नुकतीच चर्चेत होती ते म्हणजे ऑलिम्पिकमधील अपात्रतेमुळे. १०० ग्रॅम अधिक वजनामुळे तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अधूरेच राहिले. त्यानंतर तिने क्रिडा लवादाकडे याचिका केली की किमान तिला रौप्य पदक मिळावे पण त्याचा काही सकारात्मक निकाल लागला नाही. त्यानंतर भागतात परतल्यानंतर तिने काही दिवसातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपविरुद्ध उभे राहण्याचे एक ठोस कारण म्हणजे विनेश आणि इतर कुस्तीपट्टूनी जंतरमंतरवर केलेले आंदोलन.
हरियाणात चुरशीची लढत
हरियाणा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सध्या ९० पैकी ४८ जागांवर भाजपने मुसंडी मारली आहे. तर काँग्रेसने ३६ जागांवर आघाडी घेतली आहे. लोक दल १ आणि इतर ५ उमेदवार आघाडीवर आहे. हरियाणातील पंचकुला, नारायणगड, अंबाला सिटी, मुल्लाना, सधौरा, जगाधरी, यमुनानगर, शाहबाद, ठाणेसर, पेहोवा, गुहला, कलायत, निलोखेरी, बडोदा, उचाना कलान, टोहाना, रतिया, कालानवली, डबवली, सायर. एलेनाबाद, उकलाना, नारनौंड, हांसी, मेहम, गढ़ी सांपला-किलोई, बदली, बेरी, नूह, फिरोजपूर झिरका, पुनहाना, होडल, प्रिथला आणि फरीदाबाद एनआयटी या मतदारसंघातून काँग्रेस सध्या आघाडीवर आहे. काँग्रेस पक्ष ६० पर्यंत गेला होता. मात्र, काँग्रेसचे आकडे आता खाली आले असून हरियाणात काँग्रेसमध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.
भाजपाने मारली मुसंडी
निवडणूक आयोगानुसार, सध्याच्या अंदाजानुसार हरियाणात भाजप ५० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने ३६ जागांवर आगेकूच केली आहे. हरियाणात भाजपने राहुल गांधी यांच्या जिलेबी विधानावरून चिमटे काढायला सुरूवात केली आहे. दुपारपर्यंत निकालाचे चित्र पालटल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यांची नकली जिलेबी बाहेर आल्याचा टोला भाजप पदाधिकाऱ्यांनी लगावला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा