Friday, May 3, 2024
Homeनाशिकनिफाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष

निफाड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष

निफाड। प्रतिनिधी Niphad

सध्या वातावरणात होणार्‍या बदलांमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. मागील काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण अधिक वाढलेले असल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे उष्माघात झालेल्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील राठोर, अनंत पवार यांच्या आदेशनुसार तसेच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांच्या मार्गदर्शनानुसार उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करून त्यात 5 बेड हे राखीव ठेवण्यात आले आहे.

डॉ. राजीव तांभाळे यांनी उष्माघाताबाबत सांगितले की, वातावरणाचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस असते तोपर्यंत मानवाला त्याचा काहीही त्रास होत नाही. मात्र, यापेक्षा जास्त तापमान असल्यास त्याचा मानवी शरीराला त्रास होऊ शकतो. तसेच, तापमान आणि आद्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो, असेही त्यांनी नमूद केले. उष्णतेच्या लाटेचा अधिक त्रास उन्हात कष्टांची कामे करणार्‍या लोकांना, वृद्ध व लहान मुलांना, स्थूल लोकांना, पुरेशी झोप न घेणार्‍या लोकांना, गरोदर महिलांना, अनियंत्रित मधुमेह व हृदयरोग रुग्णांना व व्यसनी लोकांना होऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

उष्णतेची लक्षणे

कातडी लालसर होणे, ताप व डोके दुखणे, खूप घाम येणे, थकवा येणे, चक्कर व उलटी येणे या प्रकारची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळील सरकारी दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

उष्माघातामध्ये काय करावे

पुरेसे पाणी प्यावे, प्रवासात पाणी सोबत ठेवावे, हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरावे, उन्हात जातांना टोपीखाली ओलसर कपडा ठेवावा, ओलसर पडदे, पंखा, कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवावे.

उष्माघातात हे करू नये

शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, कष्टांची कामे उन्हात करु नये, गडद रंगाचे व तंग कपडे घालू नये, मद्य, चहा, कॉफी व सॉफ्ट ड्रिंक टाळा, शिळे अन्न खाऊ नये, माणसांसोबत पक्षी, प्राणी व वनस्पतींची काळजी घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी नागरिकांंना केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या