मुंबई । Mumbai
महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, अवकाळी पावसानंतर अवघ्या काही दिवसांत मान्सूनने राज्यात आगमन केल्याने पावसाळी संकट निर्माण झाले आहे. राजधानी मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबईसह नवी मुंबई, रायगड या भागांत सोमवारी (दि. 26 मे) तुफान पावसाची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर पुणे, कोल्हापूर, सातारा यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईच्या अनेक भागांत – घाटकोपर, कुर्ला, डोंबिवली, ठाणे – रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन सेवा पावसामुळे कोलमडली आहे. ठाणे ते कल्याण आणि कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटांनी उशीराने धावत आहेत. यामुळे लाखो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने आज थोडी उसंत घेतली आहे. सकाळपासून ऊन पडल्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तब्बल पाच-सहा दिवसांनी सुर्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मोसमी पावसाने यंदा अपेक्षेपेक्षा लवकरच कोकणात प्रवेश केला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी (दि. 25 मे) मान्सूनने तळकोकणात देवगड परिसरात हजेरी लावली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढली असून, याचा थेट परिणाम कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर होत आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई परिसरात सतत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या असल्या तरी एकाच रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पायाभूत सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. विशेषतः लोकल ट्रेनवर परिणाम झाल्यामुळे कार्यालयीन प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. मान्सूनचे वेळेआधी आगमन, मुसळधार पाऊस आणि सतत वाढणारा हवामानाचा धोका लक्षात घेता, प्रशासन आणि नागरिक दोघांनीही पुढील काही दिवस अधिक सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. हवामान विभागाच्या सूचना वेळोवेळी तपासून योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.