शेवगाव/पाथर्डी |प्रतिनिधी| Shevgav | Pathardi
जिल्ह्यातील शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा संकटांना शेतकर्यांनी धैर्याने सामोरे जावे. शासन शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना वार्यावर सोडणार नाही. पुढील 10 दिवसांत संपूर्ण पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी मदतनिधी थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेती क्षेत्र, पिके, फळबागा, पशुधन व घरे यांचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी सांगितले.
शेवगाव तालुक्यातील भगूर व पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावांतील अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषीमंत्री भरणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकर्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. यावेळी आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रांताधिकारी प्रसाद मते, शेवगावचे तहसीलदार आकाश दाभाडे, पाथर्डीचे तहसीलदार डॉ. उध्दव नाईक, श्रीरामपूर उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, महादेव लोंढे, गटविकास अधिकारी सोनल शहा, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, भगुरचे माजी सरपंच वैभव पुरनाळे, उपसरपंच नागेश पुरनाळे, वरूरचे सरपंच सचिन मस्के, भाजपा तालुका अध्यक्ष महेश फलके, शहराध्यक्ष बापू धनवडे, शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, बाळासाहेब फटांगडे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मदतीसंदर्भातील पक्ष व संघटनेची निवेदने स्वीकारली.
भरणे म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत 7 लाख 49 हजार एकर शेती क्षेत्राचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यापैकी मागील एका महिन्यातच 6 लाख 34 हजार एकर क्षेत्र बाधित झाले आहे. शेतकर्यांचे एक गुंठाही क्षेत्र पंचनाम्यापासून सुटणार नाही. या नैसर्गिक संकटात शेतकर्यांना दिलासा मिळावा यासाठी ई-पीक पाहणीस मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पीक विमा कंपन्यांना तातडीने मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या शेतकर्यांचे शेत, घर किंवा घरावरील छत वाहून गेले आहे, अशा शेतकर्यांना जिल्हा प्रशासनामार्फत गृहोपयोगी साहित्य, किराणा व आवश्यक तातडीची मदत पुरविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत. नैसर्गिक संकटाचा सामना करताना ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणाबाबत शासन गंभीर आहे. अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल, असेही मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.
प्रशासना विषयी शेतकर्यांची नाराजी
मंत्री भरणे हे भगूर येथे पाहणी करत असताना पंचनाम्याबाबत शेवगाव तालुका प्रशासनाविषयी काही शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर तालुक्यातील प्रत्येक शेतकर्यांच्या एकएका गुंठ्याचा सरसकट पंचनामा करावा असे आदेश भरणे यांनी संबंधितांना दिले. यावेळी भरणे यांनी उपस्थित अनेक पुरग्रस्त शेतकर्यांचे प्रश्न ऐकून घेत त्यांना धीर दिला. राज्य शासन तुमच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले. काही शेतकर्यांनी रस्त्यावरील भगुर बरोबरच वरूर तसेच पुर्व भागातील गावांतील नुकसानीची पाहणी करण्याची इच्छा बोलुन दाखवली.




