अहिल्यानगर (प्रतिनिधी)
बंगालच्या उपसागरात अती तीव्र कमी दाब क्षेत्राचे रविवारी रात्री चक्रीवादळात रूपांतर झाले. या चक्री वादळामुळे आणि अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र यामुळे महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण आणि विदर्भात धो धो पावसाचा अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पुण्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, सध्या अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र मुंबईच्या नैऋत्येकडे ६६० किमी अंतरावर असुन त्याची वाटचाल ईशान्य दिशेकडे होत आहे. त्याच्या परिणामातून आजपासून बुधवार (दि. २९) पर्यंत मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर व कोकणातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राचे रविवारी रात्री चक्रीवादळात रूपांतर झाले. सध्या ते काकीनाडा शहरापासून ५३० किमी अंतरावर आहे. एमजेआने त्याचे माँथा असे नामकरण झाले. मोथाचा मथाई भाषेतील अर्थ म्हणजे सुवासिक फुल असून मंगळवार (दि. २८) ऑक्टोबरला रात्री माँथा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होवून आंध्रप्रदेशातील काकीनाडा शहराजवळील किनारपट्टी वरून भू-भागावर आदळण्याची शक्यता जाणवते. तेथून पुढे उत्तर दिशेने ते प्रथम ओरिसा व नंतर छत्तीसगडकडे सरकणार आहे.
सध्या बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडे विषुववृत्तीय परीक्षेत्रात म्हणजे फेज ४ व ५ मध्ये मॅडन ज्युलियन ऑसिलेशनच्या साखळीची आम्प्लिट्युड दोनच्या दरम्यान आहे. या दोलणामुळे मोंथा वादळाला वाढीव ऊर्जा मिळत असल्यामुळे त्याच्या तीव्रतेत वाढ होत आहे. जेव्हा मोंथा छत्तीसगडमध्ये प्रवेशित होईल तेव्हा संपूर्ण विदर्भात उद्यापासून तीन दिवस म्हणजे गुरुवार (दि. ३०) पर्यंत जोरदार पावसाची शक्यता जाणवते. त्याच्या परिणामातून मराठवाड्यातही त्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता बुधवार ५ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची शक्यता असून त्यापुढे हळूहळू थंडीची चाहूल असणार असल्याचे खुळे यांनी कळवले आहे.
नगर जिल्ह्याला यलो अलर्ट
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार २९ ऑक्टोंबरपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे व हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचे पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यापार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ४ हजार २३४ क्यूसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३ हजार १५५ क्युसेक, जायकवाडी धरणातून ९ हजार ४३२ क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून ८२० क्युसेक, निळवंडे धरणातून ३५० क्युसेक, मुळा धरणातून ५०० क्युसेक, घोड धरणातून ३०० क्युसेक, विसापूर धरणातून ३४२ क्युसेक, सीना धरणातून १ हजार ०३० क्यूसेक, विसापूर ७५० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
अनेक ठिकाणी दमदार पाऊस
जिल्ह्यात रविवारी सायंकाळी ते रात्री उशीरापर्यंत वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाटात अनेक ठिकाणी पाऊस बसरला. यात कोपरगाव, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यासह नगर तालुक्यातील भागाचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस भिंगारमध्ये ६६, राहुरी ४८, रखांदे आणि सुरेगाव (कोपरगाव) प्रत्येकी ३२.५, पोहेगाव ३२.३, श्रीरामपूर ३०, वेळापूर ३८.५. अस्तगाव ३२.५, राहाता ३२.५, लोणी २५.३ आणि शिर्डीत २५.५ मि.मी. पाऊस झाला आहे.





