सुरगाणा | प्रतिनिधी Surgana
तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वा-यासह अति मुसळधार पाऊस सुरु झाल्याने तालुक्यातील नार,पार, गिरणा,वाझडी, तान, मान, पिंपळसोंड येथील कावेरी, अंबिकेची उपनदी कुंभारचोंड व भुतकुड्याचा ओहळ या नद्या ओसंडून वाहत आहे.अतिवृष्टीमुळे भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली.तर काही ठिकाणी भात खाचराचे दगडी बांध फुटल्याने भात शेती पुरात वाहून गेली आहे. तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सुरगाणा ते बर्डीपाडा या रस्त्यावरील फरशी मोरी पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने खोकरी उंबरपाडा, बोरचोंड, कुकूडणे, पिंपळसोंड येथे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती त्यामुळे रस्त्यावर पुराचे पाणी ओसरे पर्यंत वाहन चालकांना चार ते पाच तास प्रतिक्षा करावी लागली. या ठिकाणी पुल होणे गरजेचे आहे.
खुंटविहीर येथील बाळू झिरवाळ, झारणीपाडा येथील शेतकरी काशिराम सोन्या खांडवी, रानविहीर येथील हरी खिरारी, भोये यांचे भात खाचराचे बांध फुटल्याने नुकसान, उंबरपाडा सु येथील संतोष सोमा खंबायत, यांचे अतिवृष्टीने भात पिकाचे नुकसान झाले असून भोरमाळ, जामुनमाथा येथील फरशी पुलाजवळील भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे.
अंबाठा ते खुंटविहिर रस्त्यावर दांडीचीबारी मध्ये ठिक ठिकाणी दरड कोसळून व झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती.दिवसभर रस्ता मोकळा करण्याचे काम प्रशासनातर्फे काम सुरु होते.दुपारी तीन वाजेनंतर पावसाचा जोर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे.भात पिके फुलो-यावर आले असून पोट-यात पाणी शिरल्याने दाणे न भरता भाताच्या ओंबीला फोकळीचे प्रमाणात वाढ होणार आहेत.




