अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना मदत उपब्लध्द करून द्यावी. मोठ्या स्वरुपात पाणी आलेल्या नागरी वस्त्यामधील लोकांच्या सहकार्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, आशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक आपतीची माहीती ना. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून जाणून घेतली. अतिवृष्टीने नागरिकांचे हाल होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पाण्यामुळे धोका असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षास्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रविवारी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने 19 महसूल मंडलातील गावांना मोठ्या नैसर्गिक संकटास सामोरे जावे लागल्याची प्राथमिक माहीती समोर आली असून यामध्ये पारनेर तालुक्यातील 3, पाथर्डी तालुक्यातील 3, श्रीगोंदा तालुक्यातील 8, कर्जत तालुक्यातील 5 मंडलाचा समावेश असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले. काही भागात घरांची पडझड तसेच शेती पिकांचे नूकसान झाले आहे. मात्र, पूर परीस्थिती ओसल्यानंतर नूकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. सध्या तरी नागरिकांना शासन स्तरावरून मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यास प्रशासनाला सांगण्यात आले असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
अतिवृष्टीने पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे विविध ठिकाणी अडकलेल्या 15 लोकांची तसेच कासारपिंपळगाव येथील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, सर्व रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचना ना. विखे पाटील यांनी दिल्या आहेत. तालुक्यातील करपडी येथे एका घराला तलावाच्या पाण्याने वेढा दिला या कुटंबातील 5 व्यक्तींना बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले आहे. नैसर्गिक संकटाने नूकसान झालेल्या रहिवाशांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना ना. विखे पाटील यांनी दिल्या असून पुढील दोन दिवस जिल्ह्याला हवामान विभागाने अति पावसाचा दिलेला इशारा विचारात घेवून उपाययोजना करण्याबाबतही सतर्कतेने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत द्या- खा. लंके
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात सतत कोसळणार्या पावसामुळे अतिवृष्टीसम परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतामधील पिकांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या शेतीवर तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढे-नाले भरून वाहत असल्याने वाड्या-वस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते वाहून गेले आहेत. शाळकरी मुले, शेतकरी व ग्रामस्थ यांचा दळणवळणाचा प्रश्न गंभीर झाला आहे.




