मुंबई । Mumbai
राज्यात पावसाचा जोर (Heavy Rain) चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यादरम्यान, हवामान विभागानं (IMD) राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून किनारपट्टीवर वेगाने बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत आहे.
हे हि वाचा : भंडारदरात धो-धो पाऊस, प्रवरेला पूर
वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे वारे पश्चिम घाट ओलांडून पुढे येत आहेत. त्यामुळे घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय उत्तर प्रदेश आणि ईशान्य मध्य प्रदेशावर आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवस वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट दिला आहे. या काळात अतिवृष्टीसह पाऊस होऊ शकतो. तर, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, नाशिक,धुळे, नगर, नंदुरबार, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हे हि वाचा : जिल्ह्यातील नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, काल पुणे जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 पर्यंत नोंदवलेली पावसाची आकडेवारी पुणे आणि आसपासच्या भागात लक्षणीय पर्जन्यमान दर्शवते. या यादीत गिरीवन 67.5 मिमी पावसासह अव्वल असल्याचे पाहायला मिळते.
त्यापाठोपाठ लोणावळा (58 मिमी) आणि लवासा (57.5 मिमी) आहेत. निमगिरी (56.5 मिमी), माळीण (34 मिमी), एनडीए (29 मिमी) आणि लव्हाळे (27 मिमी) सारख्या इतर ठिकाणी देखील लक्षणीय पाऊस झाला. पुण्यातील चिंचवड परिसरात 23.5 मिमी, तर मध्य पुण्याच्या शिवाजीनगर भागात 16मिमी पावसाची नोंद झाली. दौंडमध्ये सर्वात कमी 1 मिमी पाऊस झाला.
हे हि वाचा : गोदावरी दुथडी! नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून 52 हजार क्युसेकने विसर्ग