सिन्नर | प्रतिनिधी Sinnar
शहरासह तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला आज दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सर्व रस्ते पाणीमय झाल्याने वाहतूक कोंडीचा वाहन धारकांना सामना करावा लागला. काही भागात वृक्ष उन्मळून पडले. सिन्नर बसस्थानकाच्या छपराचा स्लॅबचा काही भाग कोसळल्याने फलाटावर उभी असलेली शिवशाही बस व कारचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
आगाराने सुरक्षितता म्हणून सर्व बसेसला आवारात प्रवेश बंद केल्याने प्रवाशांचे हाल झाले तर बस स्थानकासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रागा लागल्या होत्या. तालुक्यातील देव नदी, शिवनदी व शहरातील सरस्वती नदीलाही मोठा पूर आला असून अनेक बंधारे 70 ते 75% पर्यंत या एकाच पावसाने भरले आहेत. या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
दुपारी तीनच्या दरम्यान सुरू झालेल्या या पावसाने जवळपास दीड तास शहरासह तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला झोडपून काढले. पावसाने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. विजयनगर, कानडी मळा, सरदवाडी रोडसह अनेक उपनगरांमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यातून रहिवाशांचे चांगले हाल झाले. बारागाव पिंपरी रस्त्यावर कानडी पेट्रोल पंपाच्या पुढे रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी प्रचंड वेगाने वाहत असल्याने वाहने चालवणे अवघड बनले होते. विजयनगरसह सिन्नर शहरातील सर्व रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. उपनगरांमध्ये अनेक भागात पाण्याचे तळे साचले होते.
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नळ्याही तुडुंब भरून वाहत होत्या. शहरातील एकमेव सरस्वती नदीला पूर आला असून खासदार पुलासह पडक्या वेस भागातील फरशीवर पुराचे पाणी आल्याने रहदारीसाठी हा रस्ता बंद झाला होता. नाशिक पुणे महामार्गावरील महोदरी येथील इंजिनिअरिंग कॉलेज पासून सिन्नर शहरापर्यंत तर नायगाव, जायगाव, ब्राह्मणवाडेसह थेट सुळेवाडी, बारागाव पिंपरी मार्गे पुन्हा शहरापर्यंतच्या भागात या पावसाने वादळी वाऱ्यासह थैमान घातले.
पांढुर्लीपासून डुबेरे पर्यंतच्या भागात पावसाचा जोर दिसून आला. ठाणगाव रस्त्यावरील डूबेरेवाडी जवळील जगबुडी बंधारा या पावसात 75 टक्के पर्यंत भरला आहे. या पावसाने परिसरातील अनेक बंधारे अर्धे अधिक भरले आहेत. या पावसाने कांद्याचे मोठे नुकसान केले आहे. काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ढोकी नदीलाही पूर आला असून डुबेरेसह परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते.
संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या एसटी महामंडळाच्या सिन्नर आगाराला वादळी वाऱ्याने वाऱ्यासह आलेल्या या पावसाने मोठा तडाखा बसला. बस स्थानकाच्या स्लॅबचा काही भाग पडडीसह पडल्याने बस स्थानक परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यात प्रवाशांना कुठलीही इजा झाली नसली तरी फलाटावर लावलेली शिवशाही बस व एक कार स्लॅबच्या मलब्याखाली दाबले गेले. त्या दोन्ही वाहणांचे नुकसान झाले असले तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही. भर पावसात प्रवाशाला सोडण्यासाठी आलेला कारचालक बस स्थानकात उभा असल्याने थोडक्यात बचावला. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना चालकाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या इमर्जन्सी दरवाजातून बाहेर काढण्यात आले.
बसस्थानकाचा स्लॅब पडल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर बस स्थानक पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या सर्वच बसेसना बस स्थानकात प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तर सायंकाळच्या वेळी ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसही रद्द करण्यात आल्या. आज रविवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या रहिवाशांना बस बंद झाल्याचा फटका बसला. बस स्थानकावर प्रवेश नसल्याने अनेक बसेसने रस्त्यावरच प्रवाशांना सोडले. त्यातून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळाली. बस स्थानकाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब लागल्या होत्या .
व्हिडीओ पाहा इथे