धाराशिव | Dharashiv
महाराष्ट्रातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आहे. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी अनेक ठिकाणी एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या बचावकार्यात उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः एनडीआरएफच्या जवानांसोबत सहभागी होऊन या कुटुंबाला सुरक्षित स्थळी आणले.
नेमकी घटना काय आहे?
धाराशीव जिल्ह्याच्या परांडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडनेर गावात पूर आला होता. येथील एका घरात पाणी शिरल्याने एकाच कुटुंबातील चार व्यक्ती, ज्यात एक लहान मुलगा आणि एक वृद्ध महिला यांचा समावेश होता, मध्यरात्री २ वाजेपासून घराच्या छतावर अडकून पडल्या होत्या. अन्न-पाण्याविना हे कुटुंब मदतीची वाट पाहत होते. त्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धावून जात ते स्वत: त्यांच्या बचावासाठी पुराच्या पाण्यात उतरले. त्यांच्या या कार्याचे अनेकांनी कौतुक केले आहे. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
शिवसेना ठाकरे गटाकडून कौतूक
“बाळासाहेबांचा शिवसैनिक हे काय रसायन आहे याची प्रचिती आज धाराशिव जिल्ह्यात दिसून आली! धारशिव जिल्हातील वडनेर, तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील आजी, २ वर्षांचा मुलगा व दोन व्यक्ती रात्रीपासून घराच्या छतावर अडकले होते. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर ह्यांनी NDRF च्या जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका केली.”, असे शिवसेना ठाकरे गटाने एक्सवर पोस्ट करत ओमराजे निंबाळकर यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
ओमराजेंची भावनिक पोस्ट
या यशस्वी बचावकार्यानंतर खासदार निंबाळकर यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले की, ”आज वडनेर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी, २ वर्षांचा मुलगा व २ व्यक्ती रात्री २ पासून पूर्ण पाण्याने वेढले होते व स्वतःच्या घरावर अन्न-पाण्याविना मदतीच्या अपेक्षेने अडकले होते. एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी आज संध्याकाळी ८ वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले!”, “या कार्यात एनडीआरएफच्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडले, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन!”.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




