Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रRain Update : मुंबईसह उपनगरात मुसळधार! सखल भागात पाणी, रेल्वे वाहतूक...

Rain Update : मुंबईसह उपनगरात मुसळधार! सखल भागात पाणी, रेल्वे वाहतूक उशिराने

मुंबई । Mumbai

मुंबई आणि परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना देखील करावा लागत आहे. या मुसळधार पावासाचा परिणाम रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे वाहतूक सेवेवरही झाला आहे. मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडवली आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

- Advertisement -

जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी झाल्यामुळे लोकल चालवताना लोको पायलटला अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक साधारणपणे पंधरा ते वीस मिनिट उशिराने सुरू आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंधेरी सबवे. हा देखील पाण्याने संपूर्ण भरलेला असून साधारणपणे चार ते पाच फूट इतके पाणी साचल्यामुळे वाहतूक पोलिसांनी ये-जा करण्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांना बंदी केली आहे. त्यामुळे आता अंधेरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहन चालकांना कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार समुद्रात दुपारी अडीचच्या दरम्यान लाटा उसळण्याची शक्यता आहे. चार ते साडे चार मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तर, मुंबईत वेगवान वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. ४५ ते ५५ किमी वेगानं मुंबईत वारे वाहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं मुंबईकरांना कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या