सिन्नर | वार्ताहर Sinnar
सिन्नर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात शनिवारी (दि. 25) रात्री दोन ते तीन तास संततधार तर आज (दि. 26) सायंकाळी जवळपास एक तास जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शहरातील नागरिकांसह व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये दररोज सायंकाळी पाऊस पडत असल्याने व्यावसायिकांना फटका बसत आहे.
यंदा पावसाळ्यामध्ये तालुक्याच्या सर्वच भागात जोरदार पाऊस बरसला. मागील महिन्यात तर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसानही झाले. त्यानंतर काही दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, लक्ष्मीपूजनच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सणाच्या उत्साहावर विरजण पडले. पावसामुळे अनेकांना फटाके फोडताना आल्याने नाराजीचा सूर होता. महिलावर्गांकडून अंगणात करण्यात आलेल्या सजावटीवरही पाणी फिरल्याने सणाचा उत्साह कमी झाला. त्यानंतर दोन-तीन दिवस पावसाने उघडीप दिली.
मात्र, शनिवारी सायंकाळनंतर शहरासह ग्रामीण भागात पुन्हा दोन-तीन तास पावसाची संततधार सुरू होती. तालुक्याच्या पूर्वभागातील पांगरी पंचाळे शहा वावी सोमठाणे मऱ्हळ, निऱ्हाळे या भागात चांगला पाऊस बरसला. तालुक्यातील नांदूरशिंगोटे, चास, दोडी, दापूर, गोंदे शिवारातही संततधार पावसाने हजेरी लावली.
रविवारी सायंकाळीही सिन्नर शहरासह तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डुबेरे, पाडळी, ठाणगाव, सोनांबे, कोनांबे, पांढुर्ली या परिसरात पावसाने तासभर जोरदार हजेरी लावली. तसेच तालुक्याच्या नायगाव खोऱ्यातही पाऊस बरसला. सततदोन दिवस पडलेल्या पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच पावसाने शहरातील बाजारपेठेवरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे.




