मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई केवायसी पूर्ण न होणे यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी १८१ या विशेष क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्यात आली असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी एक्स या समाज माध्यमातून दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता महिला आणि बालविकास विभागाने सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी पूर्ण करण्याची सक्ती केली आहे. लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना प्रति महिना मिळणारा लाभ मिळत नसल्याची तक्रार आहे. तसेच या योजनेतील इतरही अनेक तक्रारी समोर आल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे आणि शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येईल, असे तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.





