Saturday, October 12, 2024
HomeUncategorizedऐतिहासिक सती शिळा

ऐतिहासिक सती शिळा

सिन्नर । विलास पाटील | Sinnar

येथील इतिहास अभ्यासक (History Practitioner) व शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख (Javed Sheikh) त्रिंगलवाडी किल्यावर (Tringalwadi fort) संशोधन (Research) करत असताना त्यांना नाशिक जिल्ह्याचा (nashik district) प्राचीन इतिहास (Ancient history) व परपंरा दर्शवणारी सतीची शिळा सापडली आहे.

- Advertisement -

ऐतिहासिक व सांस्कृतिक (Cultural) दृष्ट्या समृद्ध असणार्‍या महाराष्ट्राला (maharashtra) प्रचंड शौर्य गाजवणार्‍या नरवीरांची परंपरा आहे. ह्या नरवीरांच्या शौर्याच्या गाथा लेखी स्वरूपात तर कधी मौखिक स्वरूपात सापडत असतात. मात्र, कधी-कधी या शुरवीरांच्या शौर्याच्या गाथा वीरगळीच्या स्वरूपात किल्ल्यांच्या अवतीभवती किंवा मंदिर परिसरात आढळुन येत असतात. इतिहासाचे मुक साक्षीदार असणार्‍या वीरगळी दगडात कोरलेल्या विविध शिल्प चित्रामधुन त्या नरवीरांची शौर्य गाथा मूकपणे प्रकट करत असतात.

अशीच एक प्राचिन सती शिळा त्रिंगळवाडी किल्यावर सापडल्याने प्राचिन इतिहासाला उजाळा मिळाला. अशा सती शिळा जुन्नर (Junnar), सिंधुदुर्ग (Sindhudurg), नारायणगाव, पेडगाव, मुंबईतही यापूर्वी सापडलेल्या असून नाशिक परिसरासाठी अशी सती शिळा दुर्मिळ आहे. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याला जैन तिर्थांकर भगवान आदिनाथ लेणीच्या शेजारी असणार्‍या मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेलेली सदर सतीची शिळा जवळच असणार्‍या शेताच्या बांधावर उभी करण्यात आली आहे.

किल्ले त्रिंगलवाडी येथे सापडलेली सतीची शिळा काळ्या पाषाणात सलग कोरलेली असून वरती कळस आहे. त्याचा अर्थ कैलास पर्वताशी निगडित आहे. कळसानंतर दोन चौकटीत शिल्प विभागलेले आहे. कदाचित शिल्पाचा खालचा भाग भग्न अथवा तुटलेला असावा. वरती कळसाचा भाग संपल्यानंतर पहिल्या मोठया चौकटीच्या वरती चंद्र व सूर्य कोरलेले असून ‘चंद्र व सूय’ असेपर्यंत सदर वीराची कीर्ती जिवंत राहील’ असा त्याचा अर्थ स्पष्ट होतो. सती शिळेचा अर्थ लावताना खालच्या चौकटीपासून वरच्या चौकटीपर्यंत चित्र पाहिल्यावर स्पष्ट होतो.

खालच्या चौकटीत एक स्त्री अश्वारूढ असून तिच्या उजव्या हातात सतीची वाण आहे. तिच्या मागे एक स्त्री डोक्यावर टोपली घेतलेली दिसून येते. तसेच अश्वाच्या पुढे एक माणूस दिसतोे. अश्वाचा लगाम व खोगीर स्पष्ट दिसून येत असून उजव्या बाजूचा कोपरा तुटलेला आहे. वरच्या चौकटीत नंदी व त्या वरती महादेवाची पिंड स्पष्ट दिसत असून वीर पुरुष व वीर पत्नी आसनस्थ मुद्रेत शिवलिंगाला म्हणजेच महादेवाला नमस्कार करताना कोरलेले आहे. याचा अर्थ चित्रातील शुर नरवीराच्या मृत्यूनंतर सोबत असणारी स्त्री सती गेल्यानंतर अखंड सौभाग्यवती होत सहगमनाने कैलासधामाला म्हणजेच स्वर्गात पोहचले आहे.

शिल्पाची खालच्या चौकटीच्या एका बाजूने वरच्या चौकटीच्या शेवटपर्यंत काटकोनात वळलेला व सरळ वरच्या दिशेला गेलेल्या एक हाताचे शिल्प कोरलेले आहे. या कोरलेल्या हातावरूनच स्पष्ट होते की सदरचे शिल्प हे सतीची शिळा आहे. हाताचा आखीव रेखीवपणा व हातात घातलेला चुडा स्पष्टपणे नजरेस भरतो. सदर सतीची शिळा त्रिंगलवाडी या आदिवासी बहुल भागात असल्यामुळे याचे वेगळे ऐतिहासिक मुल्य आहे. आदिवासी बांधव शूरवीरांचे शौर्यगाथा वा त्यांचे दैवत असणार्‍या वाघोबा देवाचे शिल्प पाषाण शिल्पात न कोरता लाकडात कोरत असतात.

अशाच प्रकारचे वाघोबा देवाचे लाकडी शिल्प जवळच असणार्‍या आंब्याच्या झाडाजवळ दिसुन येते. सदर सती शिळा पाषाण शिल्पात असल्यामुळे ऐतिहासिक दृष्टया मोलाची आहे. त्रिंगलवाडी किल्ल्याचा इतिहास हा अगदी राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, मोगल, मराठा स्वराज्य व अगदी शेवटी पेशवाई नंतर ब्रिटिशांनी सन 1818 साली किल्ला उध्वस्त करेपर्यंतचा आहे.

या ठिकाणी अनेक लढाया झालेल्या असून काही राजपुत किल्लेदारांचाही उल्लेख या ठिकाणी सापडतो. त्रिंगलवाडीच्या पायथ्याला असणारी भगवान आदिनाथाची लेणी ही जैन धर्माचे सांस्कृतिक व धार्मिक महत्व दर्शवणारी असून त्रिंगलवाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या सुरवातीला पाषाण भिंतीत कोरलेली बजरंग बलीची भव्य मुर्ती हिंदु धर्माच्या सांस्कृतिक खुणा जपणारी आहे. तसेच आता पायथ्याला सापडलेल्या सतीची शिळा व कोरलेल्या महादेवाच्या पिंडीवरून त्रिंगलवाडी-त्रंबकेश्वर यातील दुवा दर्शवतो.

ऐतिहासिक-सांस्कृतिक-धार्मिक खुणा जपणारी, शुरवीरांच्या बलिदानाची व त्याच्या धर्मपत्नीची यशोगाथा, प्राचीन काळात या भागात असणारी सतीची परंपरा या सगळ्या ऐतिहासिक खाणाखुणा मुकपणे व्यक्त करणारी सतीची शिळा सापडणे हे नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची व गर्वाची बाब असून नव्याने इतिहासाची व संस्कृतीची कवाडे खोलणारी आहे. इतिहासाचा हा अबोल वारसा जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

इतिहासतज्ञ-संशोधक प्रा.जावेद शेख

- Advertisment -

ताज्या बातम्या