नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
चीनमध्ये (China) पसरलेल्या एचएमपीव्ही विषाणूचा (HMPV Virus) इतर देशांत फैलाव सुरू झाला आहे. भारतातदेखील काही बालकांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत आता केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. तसेच हा नवीन विषाणू नाही. २००१ मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. सरकार यासाठी सज्ज असून, आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये आढळणारा हा विषाणू भारतातही (India) आढळून आला असून, कर्नाटक, कोलकाता आणि गुजरातमध्ये या विषाणूची लागण झालेली बालके आढळली आहेत. आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा (Union Health Minister J.P. Nadda) यांनी तज्ज्ञांचा हवाला देत स्पष्ट केले की, एचएमपीव्ही अनेक वर्षांपासून जगभरात पसरत आहे. हा हवेतून पसरतो आणि सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो.
हिवाळा आणि ऋतू बदलाच्या सुरुवातीच्या महिन्यांत हा विषाणू अधिक पसरतो, पण याला फार घाबरण्याची गरज नाही. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ४ जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त देखरेख गटाची बैठक झाली. देशाच्या आरोग्य यंत्रणा आणि पाळत ठेवणारे नेटवर्क सतर्क आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारच्या आव्हानांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी तयार आहोत. काळजी करण्याची गरज नाही. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, अशी माहितीही जेपी नड्डा यांनी दिली.
मनपा, जि.प.ची आरोग्य यंत्रणा सतर्क
नाशिक । एचएमपीव्ही या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपासह जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरासह जिल्ह्यात या नवीन आजाराचे रुग्ण नसले तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन दोन्ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भारतात चार रुग्ण आढळल्यानंतर नाशिक महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
एचएमपीव्हीबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, सोशल मीडिया तसेच एकमेकांच्या बोलण्यामधून विनाकारण भीती निर्माण होते. येत्या एक-दोन दिवसात बैठक घेऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात येतील. नागरिकांनी न घाबरता आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र