मुंबई | Mumbai
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेल्या हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने 2-0 असा विजय मिळवून विजेतेपद पटकावले. एकीकडे क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना रंगला असताना दुसरीकडे हॉकीमध्ये देखील दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ आमने सामने आले होते.
क्रिकेटचा सामना पावसामुळे रद्द झाला, मात्र हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारत दमदार विजय मिळवला आणि आशिया चषक देखील आपल्या नावावर केला. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा रोमहर्षक शूटआऊटमध्ये 2-0 असा पराभव करून पहिला पुरुष हॉकी फाईव्ह आशिया कप जिंकला आहे. निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांनी एकमेकांना बरोबरीची स्पर्धा दिली.
निर्धारित वेळेपर्यंत दोन्ही संघांची 4-4 अशी बरोबरी होती. मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली. अर्धा सामना होईपर्यंत पाकिस्तानचा संघ आघाडीवर होता. त्यानंतर मात्र भारतीय संघाने लौकिकाला साजेशी खेळी करत दमदार पुनरागमन केल. डावाच्या शेवटपर्यंत पाकिस्तानशी बरोबरी साधत राहिला. एकावेळी दोन्ही संघांचे 4-4 असे समसमान गुण झाले. त्यानंतर पेनल्टी शूटआउट प्रकारात भारतीय संघाकडून मनिंदर सिंह आणि गुरज्योत सिंह यांनी गोल करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. गोलकीपर सूरज करकेरा याने पाकिस्तानकडून केले गेलेले दोन गोल रोखले. या विजयानंतर भारताने एफआयएच पुरुष हॉकी फाइव्ज वर्ल्डकप 2024 मध्ये प्रवेश केला.