अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील विनायकनगर भागातील शीतल विहार परिसरात एका वृध्द महिलेच्या घरातून अडीच तोळ्याची सोन्याची माळ चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. घर दुरूस्तीचे (नूतनीकरण) काम करणार्या दोन कामगारांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लता निवृत्ती खेडकर (वय 68) यांनी फिर्याद दिली आहे. इलेक्ट्रीशियनचे काम करणारा गुलाब निमसे व वॉलपेपरचे काम करणारा राजू (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाहीी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या घराचे दुरूस्ती काम सुरू आहे. 11 डिसेंबर रोजी रात्री 10 ते 12 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही चोरी झाली. अडीच तोळ्याची दोन पदरी सोन्याची माळ चोरट्यांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.
फिर्यादीच्या घरी सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, यावेळी कामावर असलेल्या इलेक्ट्रीशियन आणि वॉलपेपर लावणार्या कामगारांनी हा ऐवज चोरला असावा, असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. 16 डिसेंबर रोजी रात्री हा गुन्हा नोंदवण्यात आला.




