मुंबई | Mumbai –
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर
निशाणा साधत आहेत. त्यातच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कंगना राणावतने मुंबईत आपले करिअर घडवले. मुंबईने कंगनाला ओळख दिली. त्याच मुंबईला भलेबुरे म्हणणार्या कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
मुंबई सुरक्षित वाटत नाही, मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, असे कंगनाने म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी कंगनाला खडे बोल सुनावले. संजय राऊत म्हणाले की, मुंबई पोलीस मुंबई शहराचे सातत्याने रक्षण करत आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्यांना मुंबईत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, असे म्हटले होते.
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर लगेचच कंगनाने ट्विट करत, मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असे म्हटले. कंगनाच्या या ट्विटनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचे विधान केले आहे. एका वृत्त वाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे संजय राऊत यांच्या कंगनावर कारवाई करण्याच्या विधानानंतर गृहमंत्री देशमुख कंगना राणावतवर कारवाई करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कंगनाला खरोखर मुंबईत येण्यापासून महाराष्ट्र सरकार रोखणार का, असाही एक प्रश्न आता उपस्थित झाला आहे.