नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik
बहिणीच्या लग्नासाठी साठवलेली 1 लाख 75 हजार रुपयांची रक्कम असलेली बॅग हरवल्यानंतर ती अंबड पोलिसांनी परत केल्याने संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे. या घटनेत केवळ पोलिसांची तत्परता नाही तर एका सजग आणि प्रामाणिक नागरिकाचे योगदानही महत्त्वाचे ठरले.
विशाल जाधव हे आपल्या कुटुंबासह पवननगरजवळील एका फळ विक्रेत्याकडे खरेदीसाठी गेले होते. फळांची खरेदी करून ते घाईघाईने निघून गेले. मात्र, त्यांनी बहिणीच्या लग्नासाठी जमवलेली रोख रक्कम, औषधे आणि काही महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग तिथेच विसरले. या ठिकाणाहून जात असताना सुरेश कचवे यांना ती बॅग दिसली. त्यांनी बॅग उचलून तपासली असता त्यात मोठी रोख रक्कम आणि महत्वाचे दस्तऐवज असल्याचे लक्षात आले. आपल्या प्रामाणिकपणाचे उदाहरण देत त्यांनी कोणत्याही लालसेला बळी न पडता तत्काळ अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
ही माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अनिल गाढवे, राकेश पाटील, किरण गायकवाड, तुषार मते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बॅग ताब्यात घेतली आणि दोन्ही संबंधित व्यक्तींना म्हणजे विशाल जाधव व सुरेश कचवे यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या हस्ते बॅगमधील संपूर्ण 1 लाख, 75 हजार रुपये रोख रक्कम, औषधे आणि कागदपत्रे विशाल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. बॅग परत मिळाल्याने जाधव कुटुंब भावूक झाले व पोलिसांचे तसेच सुरेश कचवे यांचे आभार मानले.
यावेळी वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांच्या वतीने प्रामाणिक नागरिक सुरेश कचवे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे एक कुटुंब संकटातून वाचले.