अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर-मनमाड मार्गावरील शिंगवेनाईक (ता. अहिल्यानगर) गावातील हॉटेल दोस्ती येथे अनैतिक मानवी व्यापार (कुंटणखाना) चालविल्याचे उघडकीस आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी (18 मे) सायंकाळी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून एक जण पसार झाला आहे.
मनमाड रस्त्यावरील शिंगवेनाईक शिवारात दोस्ती हॉटेलमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने पंचासमक्ष रविवारी सायंकाळी हॉटेल दोस्तीच्या मागील खोलीत छापा टाकला.
या कारवाईत महिलांना देहव्यवसायासाठी खोली उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आढळले. पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत दोघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दीपक भाऊसाहेब साळवे (वय 30 रा. शिंगवेनाईक) याला अटक करण्यात आली आहे. तर बल्ली उर्फ बाबासाहेब साळवे (रा. शिंगवेनाईक) हा पसार झाला आहे. घटनास्थळावरून मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आहेर, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी ही कारवाई केली.